भोर आगारात गाड्या, कर्मचार्‍यांचा अभाव | पुढारी

भोर आगारात गाड्या, कर्मचार्‍यांचा अभाव

भोर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  भोर आगारात गाड्या व कर्मचार्‍यांचा अभाव असल्यामुळे एसटी बस वेळेत सुटत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना आपल्या ठिकाणी वेळेत पोहोचता येत नाही. अनेकदा तिकीट काढणारे कर्मचारी नसतात. काही गाड्या खराब आहेत. त्यामुळे भोर ते पुणे असा नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांना सहा महिन्यांपासून त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे भोर आगाराच्या कारभाराबद्दल प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

याबाबत अ‍ॅड. किरण घोणे व इतर प्रवाशांनी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे यांना निवेदन देऊन एसटी सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. भोर शहर व तालुक्यातील अनेक नागरिक सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत व सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत आपल्या नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी नियमित प्रवास करतात. परंतु हा प्रवास अतिशय त्रासदायक व अवघड झाला आहे. बर्‍याचवेळा नियमित आणि वेळेत गाड्या सोडल्या जात नाहीत.

महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे नागरिकांनी लेखी-तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, बस व कर्मचार्‍यांच्या संख्येअभावी आगाराकडून वेळोवेळी कारणे सांगून दिशाभूल केली जात आहे. कोरोना परिस्थितीपासून भोर आगाराच्या अनेक मार्गांवरील एसटी बसच्या फेर्‍या रद्द झाल्या आहेत. त्यात जुन्या गाड्या, वाहक आणि चालक यांची कमतरता, बसच्या संख्येचा अभाव असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. भोर आगारात नव्याने बस उपलब्ध कराव्यात, तशीच कर्मचार्‍यांची भरती करावी, अशी मागणी प्रवासी करू लागले आहेत.

पीएमपीएमएल बससेवा सुरू करा
भोर आगारातील अनियमित बससेवा, खराब गाड्या, अपुर्‍या बसगाड्या यामुळे प्रवासी, नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे भोर-पुणे पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी, नागरिक करीत आहेत. पीएमपीएमएल सेवा सुरू झाल्यास भोर-पुणे एसटी सेवा ठप्प होऊ शकते. त्यामुळे आगाराने एसटी सेवा सुरळीत करणे गरजेचे आहे.

Back to top button