Stock Market Closing Bell | पुन्हा नवे रेकॉर्ड! उच्चांकावरुन सेन्सेक्स-निफ्टी माघारी | पुढारी

Stock Market Closing Bell | पुन्हा नवे रेकॉर्ड! उच्चांकावरुन सेन्सेक्स-निफ्टी माघारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजाराने सोमवारी (दि.२७) इतिहास रचला. बीएसई बेंचमार्क सेन्सेक्सने आजच्या ट्रेडिंग सत्रात प्रथमच ऐतिहासिक ७६ हजारांचा टप्पा गाठला. तर एनएसई निफ्टीने २२,१०० चा सर्वकालीन उच्चांक नोंदवला. त्यानंतर दोन्ही निर्देशांक उच्चांकावरुन माघारी फिरले आणि सपाट बंद झाले. सेन्सेक्स १९ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७५,३९० वर बंद झाला. तर निफ्टी २४ अंकांनी घसरून २२,९३२ वर स्थिरावला. सेन्सेक्सने बंद होताना उच्चांकावरून ६०० अंक गमावले. बाजारातील आजच्या अस्थिरतेदरम्यान काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंगही दिसून आले.

बाजारातील घडामोडी

  • रियल्टी, बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी
  • निफ्टीवर Divis Labs टॉप गेनर
  • ऑईल आणि गॅस, पॉवर निर्देशांकात घसरण
  • बीएसई मिडकॅप ०.६ टक्क्यांनी वाढला
  • बीएसई स्मॉलकॅप सपाट बंद

क्षेत्रीय आघाडीवर काय परिस्थिती?

क्षेत्रीय आघाडीवर, बँक, रियल्टी आणि आयटी निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढून बंद झाले. तर ऑईल आणि गॅस, पॉवर आणि मीडिया ०.५-१ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.६ टक्क्यांनी वधारला. तर स्मॉलकॅप निर्देशांक सपाट बंद झाला.

बाजारात चढ-उतार

९ एप्रिल रोजी सेन्सेक्स ७५ हजारांवर होता. त्यानंतर सोमवारी २७ मे रोजी ७६ हजारांचा टप्पा पार केला. आजच्या बाजारातील तेजीत बँकिंग आणि आयटी शेअर्स आघाडीवर राहिले. शेअर बाजार खुला झाल्यानंतर त्यात घसरण दिसून आली होती. पण दुपारी १२ नंतर सेन्सेक्सने ७६ हजारांचा आणि निफ्टी २३,१०० चा टप्पा पार केला. पण अखेरच्या टप्प्यात बाजाराने तेजी गमावली आणि त्यांनी सपाट पातळीवर व्यवहार केला.

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्स आज ७५,६५५ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने ७६,००९ अंकाला स्पर्श करत नवा उच्चांक नोंदवला. सेनेक्सवर इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, एलटी, एसबीआय, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स वाढले. तर विप्रो, एनटीपीसी, सन फार्मा, आयटीसी, एम अँड एम, रिलायन्स या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

Sensex closing
Sensex closing

 

निफ्टीवर डिव्हिज लॅब टॉप गेनर राहिला. हा शेअर्स ४ टक्क्यांनी वाढून ४,३०० रुपये पार झाला. जानेवारी-मार्च तिमाहीत डिव्हिज लॅबच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा शेअर्स वधारला आहे. दुपारच्या व्यवहारात तो ४,२८३ रुपयांवर होता. त्याचबरोबर इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, अदानी पोर्टस, बजाज फायनान्स हे शेअर्सही प्रत्येकी १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर अदानी एंटरप्रायजेस, विप्रो, ग्रासीम, ओएनजीसी, आयशर मोटर्स हे शेअर्स घसरले.

बाजारात नेमकं काय घडलं?

जागतिक बाजारातील तेजी आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या काही दिवस आधी गुंतवणूकदारांची आशावादी भावना हे घटक देशांतर्गत बाजारातील विक्रमी तेजीमागे होते. आरबीआयने सुमारे २ लाख कोटी विशेष लाभांश जाहीर केल्यानंतर गेल्या दोन सत्रांत भारतीय बाजाराने नवीन शिखर गाठले. गुंतवणूकदार ३१ मे रोजी जाहीर होणाऱ्या मार्च तिमाहीच्या जीडीपी आकड्यांची तसेच ४ जून रोजी होणाऱ्या निवडणूक निकालाची वाट पाहत आहेत. यामुळे बाजारात काही प्रमाणात अस्थिरताही दिसून येत असल्याचे असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

अमेरिकेतील शेअर बाजारातील निर्देशांक २४ मे रोजी उच्च पातळीवर बंद झाले. तर आज आशियाई निर्देशांक वाढले. जपानचा निक्केई निर्देशांक वाढून बंद झाला आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button