रात्रीच्या वेळी प्रशिक्षण विमानाबरोबरच ड्रोनच्या घिरट्या : नागरिकांमध्ये संभ्रमावस्था | पुढारी

रात्रीच्या वेळी प्रशिक्षण विमानाबरोबरच ड्रोनच्या घिरट्या : नागरिकांमध्ये संभ्रमावस्था

खोर : पुढारी वृत्तसेवा : मागील एक आठवड्यापासून दौंड व बारामती परिसरात रात्रीच्या वेळी आकाशात फिरणार्‍या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दौंड तालुक्यातील वरवंड, पाटस, खोर; तर बारामती तालुक्यातील वढाणे, बोरकरवाडी, सुपे परिसरात हे ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीबरोबरच चोरट्यांबाबत दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
याबाबत माहिती देताना बारामती एअरपोर्ट व्यवस्थापक विभागाच्या प्रमुख हेमलता निलाखे म्हणाल्या, दौंड व बारामतीच्या परिसरात रात्रीच्या सुमारास आमची प्रशिक्षण घेणारी शिकाऊ विमाने असून, नागरिकांनी भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही.

आमच्या वैमानिकांना रात्रीच्या वेळीस विमान कसे चालवायचे याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे विमान अगदी लहान असून, याचा आवाज जास्त येत नाही. रात्रीच्या वेळी फक्त लाईट दिसते. हे जमिनीपासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर फिरत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, याच बरोबरच ड्रोनदेखील अवकाशात घिरट्या मारीत असल्याने नागरिकांनी सांगत याबाबत सवाल उपस्थित केला आहे. ड्रोन कोणत्या उद्देशाने फिरवले जाते व या मागील हेतू काय? याचा मास्टरमाईंड शोधून काढण्याचे काम पोलिस प्रशासन व महसूल विभागाने हाती घेण्याची मागणी पुढे आली आहे. बेकायदेशीररीत्या कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता हे ड्रोन रात्रीच्या वेळी आकाशात फिरवून दहशत पसरविण्याचे काम कोण जाणूनबुजून करीत आहेत, याचा खुलासा बारामती व दौंड प्रशासन तसेच एलसीबीने करण्याचे गरजेचे आहे.

ड्रोन समजून विमान पाडल्यास अनर्थ घडण्याची शक्यता

नागरिकांनी हे ड्रोन पडण्याचे संकेत दिले आहे. या वेळी चुकून बारामती एअरपोर्टचे प्रशिक्षण घेणारे विमान पाडले गेले तर मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे घटनेच्या मुळाशी जाऊन या गोष्टीचा छडा लावून बारामती, दौंड व यवत पोलिस ठाणे तसेच दोन्ही तालुक्यांतील तहसीलदारांनी याबाबत सखोल खात्री करून घेणे गरजेचे असून, नागरिकांमधील संभ्रमावस्था दूर करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा

Back to top button