’सोमेश्वर’चे 14 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट : जगताप | पुढारी

’सोमेश्वर’चे 14 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट : जगताप

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्यात प्रथम स्वतःच्या गुणवत्तेवर दर जाहीर करतो. एकीकडे एफआरपी मिळत नसताना ‘सोमेश्वर’ने एफआरपीपेक्षा 500 रुपये जादा दर सभासदांना दिला आहे. सहकार टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पाठीशी आहेत. शेतकरी, कामगार समाधानी राहावा, यासाठी गेल्या 8 वर्षांत ‘सोमेश्वर’ने 3100 रुपये सरासरी दर दिला आहे. सोमेश्वर कारखान्याने येणार्‍या गाळप हंगामात 14 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, सभासदांच्या सहकार्‍याने ते पूर्ण करू, असा विश्वास ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केला. ‘सोमेश्वर’ने राज्यात एफतिटन 500 रुपये जास्त सर्वाधिक दर दिल्याबद्दल मुरुम (ता. बारामती) येथे शेतकरी, ग्रामस्थांच्या वतीने संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला, त्या वेळी जगताप बोलत होते.

या वेळी उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, ज्येष्ठ ग्रामस्थ पोपटराव जगताप, संचालक राजवर्धन शिंदे, सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, ऋषिकेश गायकवाड, मुरुमचे सरपंच नंदकुमार शिंगटे, डॉ. अमोल जगताप, डॉ. राहुल शिंगटे, पी. के. जगताप, कौस्तुभ चव्हाण, प्रदीप कणसे, रमेश जगताप, अजयश्री पतसंस्थेचे चेअरमन माऊली कदम, सोसायटीचे चेअरमन विकास जगताप तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

जगताप म्हणाले की, दुष्काळ परिस्थितीमुळे ‘सोमेश्वर’ला जवळपास दोन लाख टन गाळपाचा फटका बसला आहे. जिरायती भागात ऊस वाळून चालला आहे. अनेक शेतकर्‍यांनी गुर्‍हाळ व जनावरांच्या चार्‍यासाठी ऊस तोडाला आहे. ‘सोमेश्वर’ उपपदार्थावरही भर देत आहे. ऑक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरच्या पंधरवड्यात ‘को-जन’ची विस्तारवाढ होईल. उपाध्यक्ष प्रणिता खोमणे यांनी, पवार कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली परिसराचा शाश्वत विकास होत असल्याचे सांगितले.

माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे म्हणाले की, फुले 265 च्या लागवडीस प्रोत्साहन, ठिबक सिंचन, खतपुरवठा यातून कारखाना उसाबाबत स्वयंपूर्ण झाला आहे. सभासदांनी या वर्षी एक टिपरेही बाहेर देऊ नये. केंद्र सरकारच्या निर्णयांचा फायदा आपल्याला झाला.
या वेळी मुरुम ग्रामपंचायत, अजयश्री पतसंस्था, मुरुम सोसायटी, मल्लिकार्जुन सोसायटी, मल्लिकार्जुन दूधसंस्था, शिवशंभो ज्येष्ठ नागरिक संघ, सर्वोदय पतसंस्था, आधार पतसंस्था यांच्या वतीने संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वर मदने व प्राचार्य पी. बी. जगताप यांचा सत्कार करण्यात आला. कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, फत्तेसिंह चव्हाण, नीलेश शिंदे, संदीप सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. मनोहर कदम यांनी केले.

 

Back to top button