पुणे : हरवलेली मुले आई-वडिलांच्या कुशीत | पुढारी

पुणे : हरवलेली मुले आई-वडिलांच्या कुशीत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  घरासमोर खेळणारी दोन मुले अचानक गायब झाली. त्यांचा काही तासांतच मुंढवा पोलिसांनी शोध लावून त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. हरवलेली मुले पाहून आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केशवनगर येथे राहणार्‍या चैताली संदीप मोरे व सुधीर महादेव मोरे यांची मल्हार मोरे (वय 4) आणि रोहित मोरे (वय 3) ही दोन मुले घरासमोर खेळत असताना रस्ता चुकून कोठेतरी भटकली. त्यांचा शोध घेऊनही ती त्यांच्या आई-वडिलांना सापडली नाहीत. मुले सापडत नसल्याने घाबरलेल्या अवस्थेत दोन्ही मुलांच्या पालकांनी केशवनगर चौकी गाठली. तेथील चौकी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक धनंजय गाडे यांनी प्रथम त्यांना धीर व आधार देऊन त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक चौकशी करून लहान मुलांचे वय लक्षात घेता वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांना माहिती दिली.

या घटनेची दखल घेऊन ताम्हाणे यांनी मुलांचे फोटो पोलिस ठाणे, तसेच नागरिकांच्या ग्रुपवर शेअर करून शोध घेण्याचे आदेश दिले. त्या प्रकरणात अंमलदार सचिन बोराटे, प्रवीण कोकणे, नीलेश पालवे यांनी शिवाजी चौक, पवार वस्ती, कुंभार वाडा, नदीपात्र येथे शोध घेतला. या वेळी अंमलदार यांना ती मुले कुंभारवाडा नदीपात्रात घाबरलेल्या अवस्थेत दिसली. त्या मुलांना अंमलदार यांनी केशवनगर पोलिस चौकीत आणले. त्यानंतर मुलांच्या आई-वडिलांकडे मुलांना सुपूर्त केले. या वेळी मुलांना पाहुन त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांतून पाणी टपकले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

हेही वाचा : 

शिवशाही बसला नारायणगाव येथे अपघात; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Bihar News:बिहारमध्ये भरदिवसा अज्ञातांकडून पत्रकाराची हत्या

Back to top button