संस्थास्तरावरील प्रवेशासाठी 25 ऑगस्टपर्यंत मुदत ! | पुढारी

संस्थास्तरावरील प्रवेशासाठी 25 ऑगस्टपर्यंत मुदत !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  संस्थास्तरावरील बीई, बीटेकची प्रवेश प्रक्रिया दि. 17 ते 25 ऑगस्टदरम्यान काटेकोरपणे पार पडेल, याची दक्षता घेण्यात यावी. नियमाप्रमाणे प्रवेश झाले नसल्याचे सिध्द झाल्यास प्रवेश नियामक प्राधिकरणस्तरावर असे प्रवेश रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी सेल) आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिला आहे. सीईटी सेलकडून इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीए, एमसीए अशा विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश फेर्‍यांच्या (कॅप राउंड) माध्यमातून राबविण्यात येते. या फेर्‍यानंतर उर्वरित राहणार्‍या जागा तसेच व्यवस्थापन कोट्यातील जागांचे प्रवेश हे संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेद्वारे होणे गरजेचे आहे. या प्रवेशांसाठी महाविद्यालयांनी जाहिरात प्रसिद्ध करून, त्याची माहिती पत्रकाद्वारे महाविद्यालयांच्या दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे.

प्रवेशासाठी आलेल्या अर्जांतून, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वाधिक गुण मिळणार्‍या विद्यार्थ्याला प्रवेशासाठी प्राधान्य देणे गरजेचे असतानाच महाविद्यालयांकडून नियमावलीची मोडतोड करून लाखो रुपयांचे डोनेशन देणार्‍या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येत आहे. या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. याविरोधात युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर वारभुवन यांनी संबंधित परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था नियम 13 मधील तरतुदींनुसार काटेकोरपणे होईल, याची दक्षता घेण्यात यावी. संस्थास्तरावरील प्रवेश हे नियमबाह्य पद्धतीने घेतल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित प्रवेश हे प्रवेश नियामक प्राधिकरणस्तरावर रद्द होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Jara Jivantika Pujan : श्रावणातील पहिला सण जरा जिवंतिका पूजन; जाणून घ्या महत्व आणि महात्म्य

Shravan Upvasache Dhirde : खिचडी नकोय! मग मस्त उपवासाचे खमंग धिरडे करा

 

Back to top button