Jara Jivantika Pujan : श्रावणातील पहिला सण जरा जिवंतिका पूजन; जाणून घ्या महत्व आणि महात्म्य | पुढारी

Jara Jivantika Pujan : श्रावणातील पहिला सण जरा जिवंतिका पूजन; जाणून घ्या महत्व आणि महात्म्य

पुढारी ऑनलाइन डेस्क : Jara Jivantika Pujan : व्रत वैकल्याच्या जप-तपाच्या श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या श्रावण महिन्यातील पहिला सण जरा जिवंतिका पूजन उद्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. श्रावण महिन्यात शुक्रवारच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे. त्याच प्रमाणे देशातील अनेक भागांमध्ये श्रावणी शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजनाचे मोठे महात्म्य आहे. श्रावणातील पहिला शुक्रवार उद्या (दि.18) आहे. त्यामुळे या शुक्रवारी जरा-जिवंतिकाच्या पूजनाने श्रावणातील पहिला सण साजरा होणार आहे. चला जाणून घेऊया जरा-जिवंतिका पूजनाचे महत्व आणि महात्म्य…

Jara Jivantika Pujan : कोण आहेत जरा आणि जिवंतिका आणि काय आहे महात्म्य

जरा आणि जिवंतिका या प्राचीन काळापासून भारतात पूजल्या जाणाऱ्या दोन देवता आहेत. मात्र, प्रदेशानुसार यांच्या बाबतीत अनेक मत मतांतरे आहेत. मात्र, काही सामान्य आख्यायिकांप्रमाणे जरा-जिवंतिका या देवांचे वैद्य असणाऱ्या अश्विनी कुमारांच्या पत्नी आहेत.

याशिवाय जरा-जिवंतिका देवींना त्यांच्या नावाप्रमाणे देखील अर्थ देण्यात आले आहेत. जरा याचा अर्थ म्हातरपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी देवता. अर्थात माणसाला म्हातारपणापर्यंत दीर्घायुष्य देणाऱ्या देवता.

तर काही ठिकाणी त्यांना सप्तमातृकांपैकी दोन मातृशक्ती मानण्यात आले आहेत. ज्यांची पूजा केल्याने लहान मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होते. या जरा जिवंतिकांना बालकांचे रक्षण करणारी, महाशक्तिरुपिणी मानण्यात आल्या आहेत.

जरा-जिवंतिका पूजनाचे महत्व

जरा जिवंतिका या देवतांविषयी स्कंद पुराणात विस्तृत माहिती प्राप्त होते. पौराणिक माहितीनुसार एके काळी बालके लहान असतानाच काही आजारांमुळे त्यांचा मृत्यू होत होता. या आजारामधून जरा जिवंतिका देवतांनी बालकांचे रक्षण करून त्यांना दीर्घायुष्य प्रदान केले. त्यामुळे श्रावण महिन्यातील शुक्रवारी या दोन देवतांची पूजा करण्यात येते. विशेष करून प्रत्येक घरात आई आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी जरा-जिवंतिकाचे पूजन करतात. या दिवशी आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करून उपवास करतात.

Jara Jivantika Pujan : कसे करतात जरा जिवंतिकांचे पूजन

जरा जिवंतिका पूजनाचे प्रदेशाप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करण्याच्या प्रथा आहेत. मात्र या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने वाहतात. काही ठिकाणी कापसाच्या वातींचा हार करून देवीला वाहण्याची देखील प्रथा आहेत. तर काही ठिकाणी जरा जिवंतिकांची चित्र स्वरुपात पूजा केली जाते. भींतिवर गंधाने जरा-जिवंतिकाचे चित्र काढून त्यांचे पूजन केले जाते. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांसाठी दिवसभर उपवास करतात. पुरण-पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारे जरा-जिवंतिकाचे पूजन केल्याने मुलांवरील अकाळी येणारे संकट किंवा कोणत्याही आजारपणापासून मुलांचे संरक्षण होते, अशी हिंदू धर्मातील श्रद्धा आहे.

हे ही वाचा :

Shravan Month : व्रत वैकल्याच्या, जप-तपाच्या श्रावण महिन्याला उद्यापासून सुरुवात

अधिक श्रावणातील शिवदर्शन : बार्शीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नगरेश्वर मंदिर

Adhik Maas 2023 | १८ जुलैपासून अधिक श्रावण मासाला प्रारंभ, जाणून घ्या व्रतवैकल्यांची महती

Back to top button