पुण्यात भरचौकात तरूणावर कोयत्याने हल्ला | पुढारी

पुण्यात भरचौकात तरूणावर कोयत्याने हल्ला

पुणे / धायरी; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रोड भागातील धायरी फाट्याजवळ भरचौकात शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास तीन ते चार जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. घटनेत तरुणाला दहा ते बारा टाके पडले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेत मनोज सूर्यवंशी नावाचा तरुण जखमी झाला आहे. त्याला दादा मोघे, श्रावण हिरवे, बंटी कांबळे, साहिल चिकणे यांच्याकडून मारहाण झाली असून, यातील मोघे आणि हिरवे यांना ताब्यात घेतल्याचे सिंहगड रोड पोलिसांकडून सांगण्यात आले. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास सिंहगड रोडकडून धायरीकडे येणार्‍या मुख्य चौकातच ही घटना घडली. पूर्वीच्या वादातून हा प्रकार घडला.

येथील एका इमारतीच्या खाली चहाच्या टपरीजवळ सूर्यवंशी थांबलेले होते. त्या वेळी तेथून जाणार्‍या तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्यांना शिवीगाळ, मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने वार केले. यात सूर्यवंशी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याला रुग्णालयात पोहोचवण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्यासह अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर यातील दोघांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा

राजद्रोहाचा कायदा रद्द, ‘मॉब लिंचिंग’ला फाशी; अल्पवयीनांवर बलात्कार्‍यास फाशीच्या शिक्षेची तरतूद

पुण्यात खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण; पत्नी, मेहुण्याने सुपारी दिली असं सांगत 27 लाखांचा ऐवज पळवला

सांगली : भाकरी झाली मुलुखाची महाग

Back to top button