पुण्यात खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण; पत्नी, मेहुण्याने सुपारी दिली असं सांगत 27 लाखांचा ऐवज पळवला | पुढारी

पुण्यात खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण; पत्नी, मेहुण्याने सुपारी दिली असं सांगत 27 लाखांचा ऐवज पळवला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी जनावराच्या डॉक्टरचे टोळक्याने अपहरण केले. चाकू गळ्याला लावून पत्नी आणि मेहुण्याने सुपारी दिली आहे, असे सांगितले. त्यानंतर जबरदस्तीने घराचा पत्ता विचारून, रोकड आणि सोन्याचे दागिने असा 27 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी भेकराईनगर फुरसुंगी येथील 48 वर्षीय डॉक्टरांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दहा जणांविरुद्ध जखमी करून दरोडा, अपहरण, जीवे मारण्याची धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि.9) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास वडकी गायकवाडवाडी रोड, पवार वस्ती येथील परिसरात घडली.

फिर्यादी डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीची कोर्टात घटस्फोटासाठी केस चालू आहे. डॉक्टरच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. त्याने श्वान आजारी पडल्याचे सांगून डॉक्टरला उपचारासाठी बोलावले होते. डॉक्टर तेथे गेले असताना, गायकवाडवाडी वडकी येथून तीन-चार जणांनी एका विना नंबरप्लेट असलेल्या गाडीतून जबरदस्तीने जीवे मारण्याचा धाक दाखवून खंडणीसाठी अपहरण केले.

पुढे डॉक्टरला दिवेघाट मार्गे, वनपुरी-आंबोडी-वाघापूर वनीकरण येथे घेऊन गेले. त्यानंतर डॉक्टरच्या गळ्याला चाकू लावून पैशाची मागणी केली. तुझी पत्नी आणि मेहुण्याने तुझ्या नावाची सुपारी दिली आहे. तुला संपवून टाकणार आहे. तू आम्हाला 20 लाख रुपये दे तरच आम्ही तुला सोडू. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही असे म्हणून डॉक्टरच्या घराचा पत्ता विचारून घेतला. त्यानंतर मोबाईल आणि घराच्या चाव्या जबरदस्तीने घेऊन घरातील 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सात तोळे सोन्याचे दागिने आणि 25 लाख रुपयांची रोकड असा तब्बल 27 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन आरोपी फरार झाले होते.

दरम्यान, डॉक्टरच्या म्हणण्यानुसार ते आरोपींच्या गाडीत होते. रात्रभर त्यांना गाडीतून फिरवल्यानंतर पहाटे सिंदवणे घाटात सोडून देण्यात आले. डॉक्टर तेथून हडपसर पोलिस ठाण्यात आले. त्यांनी हा प्रकार पोलिसाच्या कानावर घातला. मात्र, ही घटना लोणीकाळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे गुन्हा त्यांनी दाखल करून तपास सुरू केला आहे.

श्वान आजारी असल्याचे सांगून डॉक्टरांना बोलावून घेण्यात आले होते. तेथून त्यांचे अपहरण झाले. चाकूच्या धाकाने घराच्या चाव्या घेऊन आरोपींनी रोकड आणि दागिने पळवल्याचे समोर आले आहे. पत्नी आणि मेहुण्याने तुझी सुपारी दिल्याचे आरोपींनी डॉक्टरांना सांगितले.

– अशोक काळे,
पोलिस निरीक्षक, गुन्हे.

हेही वाचा

जागतिक हत्ती दिन : देशातील 27 हजार हत्तींचे डीएनए जतन करणार

सांगली : भाकरी झाली मुलुखाची महाग

जागतिक युवा दिन विशेष : ‘स्टार्ट अप’मध्ये मुंबईनंतर पुण्याची बाजी

Back to top button