वारंवार खोदाईमुळे मोशी-देहू रस्त्याची चाळण | पुढारी

वारंवार खोदाईमुळे मोशी-देहू रस्त्याची चाळण

मोशी : पुढारी वृत्तसेवा : केबल खोदाई असो, जलवाहिनी टाकण्याचे काम असो वा तुंबलेले ड्रेनेज असो आलं मनात की खोदला रस्ता. कधी बेकायदेशीर कधी अधिकृत. अशा प्रकारांमुळे मोशी ते देहू रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहनचालकांना जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. काही वर्षांपूर्वी मोशीतील सर्वात सुंदर रस्ता म्हणून ज्याची ओळख होती, तोच रस्ता आज मोशीतील सर्वात बकाल आणि धोकादायक बनला आहे. मोशी भारत माता चौकापासून ते थेट तळवडे चौकापर्यंत तळवडे ते देहूपर्यंत असेच बिकट चित्र आहे. पावसामुळे रस्ते दुरुस्ती रेंगाळल्याचे कारण दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात पावसापूर्वीदेखील येथील रस्ते दुरुस्तीला पालिकेला वेळ मिळालेला नाही.

याबाबत स्थानिक नागरिक ज्ञानेश्वर बोर्‍हाडे यांनी सांगितले की, या मुख्य रस्त्यावर अनेक प्रसिद्ध हॅाटेल, शाळा, कॉलेज, बँक, डीमार्ट, रिलायन्स मॅाल, शॉपिंग मॅाल, दुकाने आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अनेक वेळा वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्यात रस्ते नादुरुस्त आहेत. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. चांगल्या पक्क्या डांबरीकरणातून हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. एकंदरीतच जागोजागी खड्डे, खडी पडल्याने रोजच या रस्त्यावरील प्रवासात वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र पालिका अद्यापही हा रस्ता दुरुस्ती करण्यास उत्सुक दिसत नाही.

हेही वाचा :

कोयता दहशतीचा नवा पॅटर्न ; पोलिसांसमोर अल्पवयीन गुन्हेगारांचे आव्हान कायम

पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनी होऊ देणार नाही

Back to top button