पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनी होऊ देणार नाही | पुढारी

पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनी होऊ देणार नाही

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : पवना बंदिस्त जलवाहिनी चालू करण्यासाठी आजही कोणी हात लावू शकत नाही, ही मावळच्या शेतकर्‍यांची ताकद आहे, मावळचा शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरला तर कोणीही असो जलवाहिनी होऊ देणार नाही, असा इशारा माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी पवनानगर येथे श्रद्धांजली सभेत बोलताना दिला. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पवना बंदिस्त जलवाहिनीविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागून पोलिस गोळीबारात मावळातील 3 शेतकर्‍यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला 12 वर्ष पूर्ण झाली असून, पवनानगर येथे आयोजित श्रध्दांजली सभेत ते बोलत होते.

दरम्यान, प्रकल्पाला कायम विरोध राहणार असल्याचेही माजी मंत्री भेगडे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना शिष्टमंडळासह भेटून यासंदर्भात घेऊन बैठक लावणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले. या वेळी भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, पवना बंदिस्त जलवाहिनी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, माजी सभापती एकनाथ टिळे, गुलाबराव म्हाळसकर, रिपाईचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, माजी उपसभापती शांताराम कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अलका धानिवले, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, सोपानराव म्हाळसकर, भास्करराव म्हाळसकर, प्रशांत ढोरे आदी उपस्थित होते.
या वेळी एकनाथ टिळे, राजेश खांडभोर, लक्ष्मण भालेराव आदींनी मत व्यक्त केले.

गणेश भेगडे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील कोणी काय म्हणते याला महत्त्व नाही; पण शेतकर्‍यांचा आत्मियतेचा विषय आहे, त्यामुळे तो कायमचा रद्द झाला पाहिजे, राज्यात कोण सत्तेत आले आहे म्हणून जलवाहिनी होणार नाही. परंतु कोणावरही विश्वास न ठेवता जलवाहिनी रद्द करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.

ज्ञानेश्वर दळवी म्हणाले की, आंदोलन होऊन एक तप लोटले आहे; परंतु अद्याप निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. राज्यात सर्वपक्षीय सरकार आहे त्यामुळे स्पेशल केस म्हणून हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द होईल अशी मागणी करावी, असे मत दळवी यांनी व्यक्त केले.

पवनानगर येथे श्रद्धांजली सभेत माजी मंत्री बाळा भेगडे यांचा इशारा

दरम्यान, मावळ तालुका काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आज येळसे येथील स्मृती स्थळावर अभिवादन करून शहिद शेतकरी कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे व शामराव तुपे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, भारत ठाकूर, तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ आदी उपस्थित होते.

‘ते’ 12 वर्षे करताहेत पायी जाऊन अभिवादन !
मावळ गोळीबार प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांना अभिवादन करण्यासाठी वडगाव मावळ येथील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले बाळासाहेब शिंदे हे दरवर्षी वडगाव मावळ येथून स्मृती स्थळापर्यंत पायी चालत जाऊन अभिवादन करतात, आजही त्यांनी पायी चालत जाऊन अभिवादन केले.

‘पुढारी’ चे वृत्त शेतकर्‍यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर !
पवना बंद जलवाहिनी विरोधी आंदोलन सुरू झाल्यापासून मावळ गोळीबार प्रकरणाच्या सविस्तर वृत्तांकनासह गेली 12 वर्षे सातत्याने मावळ तालुक्यातील शेतकर्‍यांची भूमिका प्रखरतेने मांडणार्‍या दै.‘पुढारी’ने आजही ‘दादा इच्छा पूर्ण करणार की शिंदे-फडणवीस भूमिका बदलणार’ हे विशेष वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त शेतकर्‍यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर झळकत होते.

हेही वाचा : 

पिंपरी : टास्कच्या बहाण्याने पावणेसात लाखांची फसवणूक

पुणे : बागायत 10, जिरायत 20 गुंठ्यांपर्यंत खरेदी करता येणार

Back to top button