कौतुकास्पद ! वेटर काम करून झाला ’पीएसआय’ | पुढारी

कौतुकास्पद ! वेटर काम करून झाला ’पीएसआय’

हडपसर : पुढारी वृत्तसेवा :  खाद्य पदार्थ घरपोहोच करण्यासह हॉटेलमध्ये वेटरचे काम करणार्‍या ससाणेनगर येथील युवकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही जिद्द, चिकाटी अन् कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश मिळवून युवकांसमोर आदर्श ठेवला आहे. याबद्दल हडपसर परिसरातून त्याचे कौतुक होत आहे. सौरभ राजेंद्र बुणगे, असे या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा सातार्‍याचा असून, वडील पेट्रोल पंपावर काम करतात.

घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तो लहानपणापासून ससाणेनगर येथील आपली आत्या अनिता सुनील कुदळे यांच्याकडे शिक्षणासाठी आला. माळीणबाई ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये त्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर माळवाडी येथील जोशी महाविद्यालय कॉलेजमध्ये पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.

कारोना काळामध्ये स्विगी कंपनीमध्ये ’फूड डिलिव्हरी बॉय’ म्हणून त्याने काम केले. हॉटेलमध्ये वेटर आणि वाईन शॉपमध्येही सेल्समन म्हणून त्याने काम केले. तसेच नोटरी वकिलाच्या हाताखाली शिक्के मारण्याचे काम त्याने केले. यामधून मिळालेले काही तो पैसे आई-वडिलांना पाठवत असे आणि उरलेले पैशातून तो स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी लागणारी पुस्तके खरेदी करत. सतत काम करीत त्याने ’पीएसआय’ होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2023 मध्ये घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत तो अखेर यशस्वी झाला आहे.

पोलिस सेवेत रुजू होण्यासाठी तो लवकरच प्रशिक्षण घेणार आहे. जिद्द ठेवली अन् कष्ट केले, तर अशक्य काही नाही, हे सौरभने दाखवून दिले आहे. हडपसर येथील भगतसिंग जीवरक्षक फाउंडेशनच्या वतीने या यशाबद्दल सौरभ याचा नुकताच सत्कार केला. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष बच्चूसिंग टाक, आझादसिंग टाक, गुरुप्रीत सिंग रबाती, शुभम झगडे आदी उपस्थित होते.

पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न कायम मनाशी बाळगले. त्यासाठी कोणत्याही कामाची लाज न बाळगता सतत कष्ट करीत राहिलो. आत्या आणि मामांनी खंबीर आधार दिल्यामुळे माझे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.
                                                                            -सौरभ बुणगे 

हे ही वाचा : 

Mumbai rains | मुंबईमध्ये येत्या २४ तासांत अतिमुसळधार

गुड न्यूज ! कळमोडी धरण १०० टक्के भरले

Back to top button