भीमाशंकर येथे ट्रेकिंग करताना ट्रेकरचा मृत्यू | पुढारी

भीमाशंकर येथे ट्रेकिंग करताना ट्रेकरचा मृत्यू

भीमाशंकर/मंचर : पुढारी वृत्तसेवा :  भीमाशंकरकडे ट्रेकिंग करून येत असताना पिंपरी-चिंचवड येथील पिंपळे निलख येथील एका 57 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. रमेश भगवान पाटील (वय 57) असे मृत झालेल्या ट्रेकरचे नाव आहे. पुण्यात राहणारे व पेशाने वकील असलेले आनंद सुभाष साळगावकर यांनी या ट्रेकचे आयोजन केले होते. त्यांनी रमेश पाटील यांच्यासह दिनेश बोडके, मंजीत चव्हाण, प्रवीण पवार, संदीप लोहकर, सुनील गुरव व इतर तीन जणांनी मिळून 25 किलोमीटर पायी ट्रेकिंग आयोजित केले होते. रविवारी (दि. 16) सकाळी पावणेसात वाजता मावळ तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथून त्यांनी पायी चालायला सुरुवात केली. पायी चालत भीमाशंकरकडे येत असताना गुप्त भीमाशंकर येथे दुपारी अडीच वाजता खेड तालुक्याच्या हद्दीत रमेश पाटील हे अचानक चक्कर येऊन खाली पडले. या वेळी सर्वांनी त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, सर्वांनी उचलून रमेश पाटील यांना भीमाशंकर मंदिराजवळ आणले. श्री भीमाशंकर येथील रुग्णालयामध्ये आणण्यात आले, परंतु हे रुग्णालय बंद असल्यामुळे घटनेची माहिती घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ त्यांना तळेघर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हलविले; मात्र रमेश पाटील यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना पुढे घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासणी करत रमेश पाटील यांना मृत घोषित केले.

हे ही वाचा :

पुणे जिल्ह्याचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार होणार

सांगली : दहावी, बारावी परीक्षा केंद्र परिसरात बंदी आदेश

Back to top button