पुणे जिल्ह्याचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार होणार | पुढारी

पुणे जिल्ह्याचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार होणार

पुणे : पुण्यासह संपूर्ण जिल्ह्याचा सर्वंकष वाहतूक आराखडा पाच वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या, महापालिका हद्दीत समाविष्ट झालेली गावे, या पार्श्वभूमीवर पुणे शहरासह जिल्ह्याचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचा निर्णय पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुमटा) बैठकीत घेण्यात आला. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ‘पुमटा’ची बैठक झाली.

या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकारांना दिली. सर्वंकष वाहतूक आराखडा (काम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) हा दर पाच वर्षांनंतर तयार केला जातो. यापूर्वी हा आराखडा 2019 साली तयार केला गेला होता. या बैठकीत एचसीएमटीआर (रिंग रोड), मेट्रो प्रकल्प आदींसंदर्भात चर्चा झाली. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा या सर्व भागातील वाहतूक व्यवस्थेविषयी या बैठकीत चर्चा झाली. महापालिका हद्दीतील लोकसंख्या वाढली आहे, तसेच गेल्या पाच वर्षांत महापालिका हद्दीत नव्याने काही गावांचा समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर नवीन सर्वंकष वाहतूक आराखडा तयार तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एचसीएमटीआर हा मार्ग यापूर्वीच्या वाहतूक आराखड्यात सुचविण्यात आला आहे. अनेक ठिकाणी हा मार्ग अरुंद दाखविला गेला आहे, या मार्गाचा वापर हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकरिताच झाला पाहिजे हा हेतू आहे. यावर निओ मेट्रो मार्ग करण्याचा विचार सुरू आहे. या मार्गाचा अभ्यास करून आवश्यक ते बदल महापालिका सुचविणार आहे, असेही आयुक्त विक्रम कुमार यांनी नमूद केले.

दोन मेट्रो मार्गात जोडरस्ता
वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग आणि हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग जिल्हा न्यायालय येथे एकत्र येतात. हे दोन्ही मार्ग एकमेकांना असमतोल नाहीत. यामुळे प्रवाशांंना ये-जा करण्यासाठी अडचण ठरू शकते. यामुळे या दोन्ही मार्गांना जोडणारा रस्ता तीन कोटी रुपये खर्च करून बांधला जाणार आहे.

खडकवासला ते हडपसर मेट्रो मार्ग
खडकवासला ते हडपसर ते खराडी या मेट्रो मार्गाचा आराखडा तयार असून, त्यास महापालिकेच्या मुख्य सभेची लवकरच मंजुरी दिली जाईल. नंतर तो मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार असल्याचेही विक्रम कुमार यांनी सांगितले.

 

Back to top button