पुणे : ‘चिरीमिरी’मुळेच अतिक्रमणे वाढली ! धायरी, सिंहगड रस्त्यावरील समस्या | पुढारी

पुणे : ‘चिरीमिरी’मुळेच अतिक्रमणे वाढली ! धायरी, सिंहगड रस्त्यावरील समस्या

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : ‘चिरिमिरी’च्या हव्यासाने नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या धायरी, किरकटवाडी, नर्‍हे, नांदेडसह सिंहगड रस्ता परिसरात अतिक्रमणांत वाढ झाली आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. धायरी येथील डीएसके ते नर्‍हे आंबेगाव गायमुख चौक रस्ता, नांदेड फाटा, किरकटवाडी फाटा, कोल्हेवाडी फाटा, धारेश्वर मंदिर, रायकर मळा, बेनकर मळा परिसरात सर्वांत बिकट स्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अतिक्रमण कारवाईनंतर काही तासांतच पुन्हा रस्त्यावर अतिक्रमणे ‘जैसे थे’ उभी होतात. अगोदरच रस्ते अरुंद आहेत. लोकसंख्या वाढल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. चौकात तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजीपाला विक्रेत्यांसह पथारी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. काही पथारी व्यावसायिकांना जागा दिल्या आहेत. मात्र, ‘नो हॉकर्स झोन’च्या ठिकाणी पथारी व्यावसायिकांच्या अतिक्रमणांचा विळखा पडला आहे.

‘चिरीमिरी द्या आणि कुठेही दुकाने थाटा’ असे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे. केंद्र शासनाच्या फेरीवाला धोरणाकडे महापालिकेने परिसरात दुर्लक्ष केले आहे. अतिक्रमणांमुळे धायरी फाटा, नांदेड फाटा आदी ठिकाणी वृध्द, महिला, विद्यार्थाना ये-जा करताना मोठ्या हलाखीला तोंड द्यावे लागत आहे. अतिक्रमणे हटवून परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करावे, अशी मागणी नागरिक व आम आदमी पक्षाचे (आप) शहर प्रवक्ते धनंजय बेनकर यांनी केली आहे. किरकटवाडी भाजप शक्ती केंद्राचे अध्यक्ष सुनील हगवणे म्हणाले की, वाहतुकीला अडथळे निर्माण होणार नाही अशा ठिकाणी विक्रेत्यांना जागा द्यावी. नांदेड फाटा ते खडकवासलापर्यंत रस्त्याची स्थिती अतिक्रमणांमुळे गंभीर झाली आहे.

हेही वाचा : 

समाविष्ट गावांतील शिक्षक जिल्हा परिषदेलाच मिळावेत; प्रशासनाची राज्य शासनाकडे विनंती

पुणे शहरातील गुन्हेगारांची पुन्हा झडती

Back to top button