पुणे शहरातील गुन्हेगारांची पुन्हा झडती | पुढारी

पुणे शहरातील गुन्हेगारांची पुन्हा झडती

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री शहरातील गुन्हेगारांची पुन्हा झडती घेतली. विशेष मोहिमेत (कोम्बिंग ऑपरेशन) पोलिसांनी 1824 गुन्हेगारांची तपासणी केली. त्यापैकी 577 गुन्हेगार मूळ पत्त्यावर वास्तव्यास असल्याचे आढळून आले. या वेळी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी 13 जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन पिस्तूल, सात काडतुसे, 13 कोयते असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

गेल्या पंधरा दिवसांत पोलिसांनी अचानक मध्यरात्री विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांची झडती घेतली. बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी 13 सराइतांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन पिस्तुले, सात काडतुसे, 13 कोयते असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. परिमंडळ एकच्या परिसरात पोलिसांनी गुन्ह्यात पसार असलेल्या दोन आरोपींना अटक केली, तसेच जुगार बंदी कायद्यान्वये दोन जणांना अटक करण्यात आली. तीन जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

परिमंडळ दोन अंतर्गत तीन आरोपींना अटक करण्यात आली. जुगार अड्ड्यांवर छापा टाकून तीन हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परिमंडळ तीन अंतर्गत एका आरोपीस अटक करण्यात आली. जुगार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. परिमंडळ तीन, परिमंडळ चार, परिमंडळ पाचमधील सराइतांवर कारवाई करण्यात आली.

गुन्हे शाखेने बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी संतोष विनायक नातू (वय 47, रा. पिंपळगाव, ता. दौंड) याला अटक केली. त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, सात काडतुसे जप्त केली. लूटमार प्रकरणात हादीहसन सर्फराज इराणी (वय 23), तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. हडपसर, सहकारनगर, भारती विद्यापीठ परिसरात इराणी आणि साथीदारांनी सोनसाखळी चोरीचे पाच गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

घरफोडी प्रकरणात भगवान विश्वनाथ सदार (वय 38, रा. पिंपळे गुरव, मूळ रा. चतारी, पातूर, जि. अकोला), सुभाष सुरेश सदार (वय 26, रा. पातूर, जि. अकोला) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. दुचाकी चोरी प्रकरणात जावेद युसूफअली इराणी (वय 27, रा. शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जुगार कायद्यान्वये 42 जणांना अटक करण्यात आली आहे. 24 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. शहरातून तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाच जणांना पकडण्यात आले.

वाहतूक शाखेने 1057 वाहनचालकांची तपासणी करून 292 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून दोन लाख 68 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, प्रवीणकुमार पाटील, रंजनकुमार शर्मा, उपायुक्त अमोल झेंडे, संदीप सिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, तसेच विविध पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेची पथके विशेष मोहिमेत सहभागी झाली होती.

हेही वाचा : 

बसमधील विद्यार्थ्यांची दमछाक थांबणार ! पीएमपी अध्यक्षांचा पुन्हा बसदौरा

पुणेकरांनो महत्त्वाची बातमी ! चांदणी चौकातील पूल ऑगस्टमध्ये होणार खुला

Back to top button