समाविष्ट गावांतील शिक्षक जिल्हा परिषदेलाच मिळावेत; प्रशासनाची राज्य शासनाकडे विनंती | पुढारी

समाविष्ट गावांतील शिक्षक जिल्हा परिषदेलाच मिळावेत; प्रशासनाची राज्य शासनाकडे विनंती

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 34 गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. या शाळांवरील सुमारे 534 शिक्षकांचे हस्तांतरण न करता त्यांची नियुक्ती मात्र जिल्हा परिषदेकडेच ठेवावी, अशी विनंती जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाला केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिक्षकांची अत्यंत गरज असून, सुमारे 1240 शिक्षकांची पदे रिक्त असल्याने काही शाळांमध्ये एकही शिक्षक उपलब्ध नसल्याचे या पत्रामध्ये म्हटले आहे.

समाविष्ट गावातील जि. प. शाळेतील शिक्षकांनीदेखील महापालिकेत हस्तांरणासाठी न्यायालयात महापालिकेमध्ये सेवा वर्ग करण्याची मागणी केली आहे. पुणे जिल्हा परिषदेत सहायक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक यांची एकूण 11,742 मंजूर पदे आहेत. त्यापैकी 10,502 शिक्षक उपलब्ध आहेत. 1,240 शिक्षकांची कमतरता आहे. सध्या 3,563 जिल्हा परिषद शाळांपैकी 80 शाळा ह्या शिक्षकाविना आहेत. परिणामी, दुर्गम खेड्यातील, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाविष्ट गावातील शिक्षक जिल्हा परिषदेला मिळावेत, अशी विनंती जिल्हा परिषदेने केली आहे.

शाळा हस्तांतरणाची विभागीय आयुक्तांची मागणी
जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेला हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे आहे. शाळांचे हस्तांतरणासाठी मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात येत आहे. त्याची रक्कम महापालिकेने जिल्हा परिषदेला देणे आहे. जिल्हा परिषदेची मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी शासनाची सहमती आवश्यक असल्याने विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी समाविष्ट 34 गावांतील शाळांचे हस्तांतरणासाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे.

 

ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळाले पाहिजे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये. रिक्त पदे असल्याने शाळांना शिक्षक उपलब्ध होईनात, म्हणून आम्ही राज्य शासनाकडे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांतील शिक्षक जिल्हा परिषदेला मिळावेत, अशी विनंती केली आहे. जर शिक्षक उपलब्ध झाले, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत नक्कीच वाढ होण्यास मदत होईल.
                          -आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद 

हेही वाचा :

पुणे : वानवडीत गॅसवाहिनीला आग ; साळुंके विहार रस्त्यावरील घटना

धक्कादायक ! स्कूल बसमध्येही आडवी आली जात !

Back to top button