बारामतीच्या जिरायत भागावर पाऊस रुसला | पुढारी

बारामतीच्या जिरायत भागावर पाऊस रुसला

लोणी भापकर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पश्चिम जिरायत भागात अद्यापही दमदार पावसाची एन्ट्री झाली नसल्याने विहिरी, तळी-नाले कोरडेच आहेत. अधूनमधून काही भागांत रिमझिम पाऊस पडत असल्याने शेतकर्‍यांच्या शेती मशागतीच्या कामांना तसेच बाजरी पेरण्यांना मागील आठवड्यात काहीसा वेग निर्माण झाला होता. अशातच काहींनी पाऊस पडेल, या आशेवर कमी ओलीवरच बाजरीच्या पेरण्या केल्या आहेत. परंतु, आता नुसतेच वारे वाहू लागल्याने सध्या पावसाचा पत्ताच नाही. त्यातच पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी पैसे भरूनही वेळेवर मिळत नसल्याने शेतकर्‍यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

जून महिन्यातही पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातील एक आठवडा उलटून गेला, तरी या भागात चांगला पाऊस पडला नसल्याने जनावरे तसेच शेळ्या, मेंढ्या यांना चारा, पाणी नाही. विकत चारा घेऊन पशुपालक, शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. बकर्‍या चारण्यासाठी बाहेरगावी गेलेले मेंढपाळ सध्या गावाकडे परतत आहेत. परंतु, गावाकडे पाऊस नसल्याने त्यांच्यापुढेही चार्‍याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

बारामती तालुक्यात बाजरीचे सुमारे 7 हजार 265 हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी 191 हेक्टर क्षेत्रावर शेतकर्‍यांनी बाजरीची पेरणी केली आहे. पावसाअभावी पेरणीची टक्केवारी कमी झाल्याने तसेच यंदा शेतकर्‍यांना उशिरा बाजरीची पेरणी करावी लागत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

सध्या तालुक्याच्या पश्चिम जिरायत पट्ट्यातील विहिरींनी तळ गाठल्याने पिकांची परिस्थिती समाधानकारक नसून शेतकर्‍यांना पुरंदर उपसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. पावसाळा सुरू होऊन महिना झाला, तरी तालुक्यात दमदार पाऊस पडला नाही.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून तालुक्यात दररोज ढगाळ वातावरण व अधूनमधून पावसाची नुसती भुरभुर होत आहे. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी पेरलेल्या बाजर्‍याही उगवल्या नाहीत. शेतकर्‍यांवर पेरणीचे दुबार संकट येणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. शेतकरी मात्र दररोज दमदार पावसाची वाट पाहत आहेत.

हेही वाचा

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर वर्षाविहारासाठी पर्यटकांनी गजबजले

पळसदेव : उजनी परिसरातील मोरांच्या संख्येत घट

जुलै महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांत 34 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

Back to top button