दोन्ही पवारांचे बारामतीत शक्तिप्रदर्शन; शहरात रॅलीदरम्यान तणावाची स्थिती | पुढारी

दोन्ही पवारांचे बारामतीत शक्तिप्रदर्शन; शहरात रॅलीदरम्यान तणावाची स्थिती

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा रविवारी (दि. 5) सायंकाळी थंडावल्या. महायुती व महाविकास आघाडी या दोन प्रमुख उमेदवारांच्या सांगता सभा बारामतीत पार पडल्या. यानिमित्ताने दोन्ही पवारांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन केले. शरद पवार गटाची रॅली नगरपरिषदेसमोर आली असताना अजित पवार गटानेही घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. सुनेत्रा पवार यांच्या सांगता सभेला अजित पवार यांच्यासह पार्थ व जय हे पुत्र, तर सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेला उर्वरित सर्व पवार कुटुंबीय उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता मिशन बंगला मैदानावर, तर सुप्रिया सुळे यांची सांगता सभा कसब्यातील लेंडीपट्टा येथे पार पडली. तत्पूर्वी दुपारपासूनच दोन्ही गटांच्या रॅली शहरात येण्यास सुरुवात झाली. शरद पवार गटाची रॅली घोषणाबाजी करत नगरपरिषदेसमोर आली असता अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.
सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेवेळी त्यांच्या आई प्रतिभा पवार, पती सदानंद सुळे, मुलगा विजय, मुलगी रेवती यांच्यासह पवार कुटुंबातील श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, रणजित पवार, शुभांगी पवार, सुनंदा पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार, कुंती पवार, सई पवार व अन्य सदस्य उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार हेच मुख्य मार्गदर्शक होते. त्यांचे पुत्र पार्थ व जय यांनी व्यासपीठाऐवजी उपस्थितांमध्ये बसणे पसंत केले.

प्रचार सांगता सभेद्वारे दोन्ही गटांनी कमालीचे शक्तिप्रदर्शन केले. मैदानाच्या अडवणुकीवरून काही अडत नसल्याचे शरद पवार म्हणाले. तर ही गर्दीच विजयाची नांदी असल्याचे रोहित पवार म्हणाले. माझ्या राजकीय जीवनात एवढी मोठी सभा झाली नाही, असे अजित पवार म्हणाले. शरद पवार यांनी त्यांच्या संपूर्ण भाषणात अजित पवार यांचा कोणताही उल्लेख केला नाही. तर अजित पवार यांनीही वडीलधार्‍यांचा आम्हाला आदरच असे म्हणत शरद पवार यांच्यावर थेट टीका करणे टाळले. सुळे, रोहित व युगेंद्र पवार यांच्यावर मात्र त्यांनी तोफ डागली.

अजित पवारांकडून रोहित पवारांची ‘अ‍ॅक्टिंग’

दोन्ही बाजूंच्या प्रचारसभा एकाच वेळी सुरू होत्या. दोन्हींकडून समोरच्या सभेत काय बोलले जाते, याकडे लक्ष ठेवले जात होते. त्यातूनच रोहित पवार भावूक झाल्याची अ‍ॅक्टिंग अजित पवार यांनी करून दाखवली.

हेही वाचा

Back to top button