सिंहगड, राजगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल; घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा | पुढारी

सिंहगड, राजगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल; घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सिंहगड, राजगडासह दुर्गम तोरणागड रविवारी पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले होते. सिंहगड घाट रस्त्यावर सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गडावर दिवसभरात 1960 दुचाकी, तर 495 चारचाकी वाहने आल्याची नोंद झाली असून, पर्यटकांकडून वन खात्याने दीड लाख रुपयांचा टोल वसूल केला आहे.

पावसाने काही काळ उघडीप घेतली होती. मात्र, धुके आणि अधूनमधून रिमझिम पाऊस पडत होता. कांदाभजी, झुणकाभाकरीचे स्टॉलही फुल्ल झाले होते. थंडगार वारे, अधूनमधून पडणारे दाट धुके आणि रिमझिम पावसात पर्यटकांनी सुटीचा आनंद लुटला. गडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल होऊन घाट रस्त्यावर तीन ते चार किलोमीटर अंतरावर थेट कोंढणपूर फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या, त्यामुळे दुपारपासून टप्प्याटप्प्याने घाट रस्ता बंद करण्यात आला.

गड फुल्ल झाल्याने डोणजे, कोंढणपूर फाट्यावरून माघारी जावे लागल्याने हजारो पर्यटकांचा हिरमोड झाला. दिवसभरात पंधरा ते वीस हजारांहून अधिक पर्यटकांनी गडावर हजेरी लावली. डोणजे-गोळेवाडी नाक्यापासून कोंढणपूर नाका ते वाहनतळापर्यंत सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत तीसहून अधिक सुरक्षारक्षक धावपळ करीत होते. घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

राजगडावरही आठ हजार पर्यटक

दाट धुके आणि रिमझिम पावसाची पर्वा न करता आठ ते दहा हजारांवर पर्यटकांनी रविवारी राजगडावर हजेरी लावली. संजीवनी माची, पद्मावती माची, राजसदर परिसरात पर्यटकांची झुंबड उडाली होती. तोरणागडावरही दिवसभरात तीन ते चार हजारांवर पर्यटकांनी हजेरी लावली. गडाचा परिसर पर्यटकांनी फुलून गेला होता.

खडकवासला परिसरात वाहतूक कोंडी

पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हवेलीचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन नम, गणेश धनवे, महेंद्र चौधरी यांच्यासह पंधरा पोलिस जवान, खडकवासला जलसंपदा विभागाचे दहा सुरक्षारक्षक सकाळपासून रस्त्यावर उतरले होते. सिंहगड, पानशेतकडून पुण्याकडे जाणार्‍या वाहनांची संख्या वाढल्याने सायंकाळपासून खडकवासला धरण चौपाटीपासून गोर्‍हे बुद्रुक ते किरकटवाडी, नांदेड फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा

नाशिक : सर डॉ. मो. स. गोसावी यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप

खडकवासला प्रकल्पात 7.62 टीएमसी पाणीसाठा

‘भारत राष्ट्र’पक्षाचे विस्ताराचे मोठे पाऊल ! : माजी आ. भानुदास मुरकुटे

Back to top button