खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर, खडकवासला या चारही धरणांतील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ सुरू आहे. गेल्या 24 तासांत प्रकल्पात 0.36 टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची वाढ झाली. रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणसाखळीत 7.62 टीएमसी (26.14 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता.
दिवसभर धरणमाथ्याखाली पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, खडकवासला वगळता वरील तिन्ही धरणक्षेत्रात अधूनमधून सरी कोसळल्या. पावसामुळे नद्या, ओढे-नाल्यांतून पाण्याचे प्रवाह वाहत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. रविवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर येथे 10 मिलिमीटर, पानशेत येथे 4 आणि वरसगाव येथे 3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर खडकवासला परिसरात पावसाने पाठ फिरवली.
रायगड जिल्ह्यालगतच्या डोंगरी पट्ट्यातही शनिवारच्या (दि. 8) तुलनेत रविवारी पावसाचे प्रमाण कमी होते. शनिवारी सायंकाळी पाच वाजता चार धरणांच्या प्रकल्प साखळीत 7.26 टीएमसी (24.89 टक्के) इतका पाणीसाठा होता. गेल्या चोवीस तासांत 0.36 टीएमसी इतकी पाण्याची वाढ झाली. सध्या खडकवासला धरणात 51.99 टक्के, वरसगाव 25.81, पानशेत 26.17 आणि टेमघरमध्ये 13.40 टक्के पाणीसाठा आहे.
हेही वाचा