नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक सर डॉ. मो. स. गोसावी यांचे रविवारी (दि. ९) पहाटे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बीवायके महाविद्यालात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी पंचवटीतील अमरधाम येथे डॉ. गोसावी यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
सर डॉ. मो. स. गोसावी यांनी भारतीय प्रशासकीय सेवा अर्थात आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्राची निवड केली. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयातून १९५८ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नाशिकला १९५७ मध्ये सुरू झालेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी प्राचार्य पदाची धुरा स्वीकारली. पुढील ३७ वर्षांपेक्षा जास्त काळ प्राचार्य म्हणून ते कार्यरत होते. पुणे विद्यापीठात वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता जबाबदारी पार पाडताना त्यांनी जे. डी. सी. बिटको इन्स्टिट्यूटच्या रूपाने व्यवस्थापन शास्त्राची गंगा उत्तर महाराष्ट्रात आणली.
डॉ. गोसावी यांनी बीवायके महाविद्यालयात पुनर्रचित अभ्यासक्रम यशस्वीपणे राबवून एक वस्तुपाठ निर्माण केला. शिक्षण क्षेत्रात विशेष रस असल्याने त्यांनी या क्षेत्रात सतत नवनवे प्रयोग केले. त्यातूनच सर्जनशील कल्पना आणि उपक्रम बहरास आल्या. त्यांच्या नेतृत्वाखालीच बीवायके महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलाैकिक मिळविला. देशातील १५,००० वाणिज्य महाविद्यालयांपैकी बी. वाय. के. वाणिज्य महाविद्यालयाला राष्ट्रीय पातळीवर नॅक संस्थेने 'अ वर्ग' देऊन सन्मानित केले आहे. देशातील आयएसओ ९००१-२०१५ हे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळालेले हे एकमेव महाविद्यालय आहे.
प्रभावी अध्यापनाबरोबरच त्यांनी अविरत मनन, संशोधन चिंतन यातून ५० हून अधिक ग्रंथसंपदा निर्माण केली. तर १०० हून अधिक पुस्तकांचे संपादन केले. व्यवस्थापन विषयात अमूल्य संशोधन करून पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन या विषयातील पदवी सर्वप्रथम प्राप्त करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील शिक्षणाबरोबरच सरांनी संस्कृत, मराठी, हिंदी व जर्मन या भाषांचे सखोल अध्ययन केले. साहित्याचार्य, साहित्य प्राज्ञ, साहित्य विशारद या पदव्या विशेष प्राविण्यासह प्राप्त केल्या.
डॉ. गोसावी यांच्या पश्चात त्यांचे बंधू विजय गोसावी, दोन पुत्र शैलेश व कल्पेश, कन्या प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, जावई प्राचार्य प्रदीप देशपांडे, दोन स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे.
विविध पुरस्कारांचे मानकरी
शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राचार्य डॉ. गोसावी यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना 'मास्टर टीचर मिलेनियम' ही पदवी बहाल करण्यात आली. भारतरत्न लता मंगेशकर याच्या हस्ते 'विद्या सरस्वती', यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र भूषण पुरस्कार, ज्ञानहिरा, राजीव गांधी फाउंडेशनचा शांतता पुरस्कार , मॅन ऑफ द इयर, नाशिक भूषण, फलटण भूषण पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
शरद पवारांकडून कुटुंबीयांचे सांत्वन
सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या निधनाची माहिती मिळताच नाशिक दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या राहत्या घरी भेटून कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी खा. सुप्रिया सुळे, माजी आ. हेमंत टकले, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड आदी उपस्थित होते. तर नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ व माजी खा. समीर भुजबळ यांनी बीवायके महाविद्यालयात डॉ. गोसावी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. माजी आ. वसंत गिते, शिवसेना नेते सुनील बागूल, मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, माजी नगरसेवक दिनकर पाटील, प्रशांत खंबासवाडकर, प्रशांत अमीन आदींनी अभिवादन केले.
नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव, महासंचालक, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी यांच्या निधनाची दुःखद वार्ता समजली. नाशिकसह महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान देत आपल्या कामातून 'टीचर ऑफ द मिलेनियम' अशी ओळख डॉ. गोसावी सरांनी निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, तसेच मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना!
-छगन भुजबळ, मंत्री
हेही वाचा :