पुणे विद्यापीठ-महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनमध्ये सामंजस्य करार! या संधी होणार उपलब्ध | पुढारी

पुणे विद्यापीठ-महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनमध्ये सामंजस्य करार! या संधी होणार उपलब्ध

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्यात मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत विद्यापीठातील वाणिज्य विभागातर्फे कर आणि लेखा व्यावसायिकांना आणि अभ्यासकांना प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच, वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना असोसिएशनच्या माध्यमातून इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे प्रेसिडेंट सीएमए श्रीपाद बेदरकर, अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते.

श्रीपाद बेदरकर म्हणाले, या सामंजस्य करारामुळे या क्षेत्रातील अभ्यासकांना योग्य प्रशिक्षण मिळून त्याचा फायदा होणार आहे. कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष अनुभवावर भर देण्यात आला आहे. या करारामुळे वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांना कर प्रणालीचे अद्ययावत ज्ञान प्राप्त होणार आहे.
या सामंजस्य करारांतर्गत टॅक्सेशन आणि कॉमर्स क्षेत्रातील अभ्यासकांना योग्य ते मार्गदर्शन प्रदान करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रांत काम करणार्‍यांना या क्षेत्रातील कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तर विद्यार्थ्यांना कर प्रणालीतील विविध बाबी समजून घेण्यासाठी त्यांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी असोसिएशन मदत करणार आहे.

हेही वाचा

Back to top button