‘भारत राष्ट्र’पक्षाचे विस्ताराचे मोठे पाऊल ! : माजी आ. भानुदास मुरकुटे | पुढारी

‘भारत राष्ट्र’पक्षाचे विस्ताराचे मोठे पाऊल ! : माजी आ. भानुदास मुरकुटे

श्रीरामपूर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  श्रीगोंद्याचे घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करीत भारत राष्ट्र समिती पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केल्याने पक्षाने आता बाळसे धरण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शेलार सध्या जिल्ह्यातील अधिकाधिक मोठ्या नेत्यांना या पक्षाकडे आणण्यास प्रयत्नशील आहेत. शनिवारी (दि. 7 जुलै) रोजी श्रीरामपूरचे माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी शेलार यांच्यासह तेलंगणात हैद्राबाद येथे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. के.चंद्रशेखर राव यांच्यासोबत मुरकुटे यांनी तब्बल एक तास चर्चा केली.

तेलंगणाच्या स्थापनेनंतर केवळ नऊ वर्षात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास पाहून नेते मंडळी आकर्षित होत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर अ.नगर जिल्ह्यात लवकरच भारत राष्ट्र समिती पक्षाचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले आहे. के.चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षाने गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यातून आता भारत राष्ट्र समिती पक्षाने छोट्या-मोठ्या नेत्यांना पक्ष प्रवेश देत आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. अ.नगर जिल्ह्यातही अनेक तालुक्यात भारत राष्ट्र समिती पक्षात स्थानिक नेत्यांनी प्रवेश करीत पक्षाच्या ध्येय धोरणांचा प्रचार सोशल माध्यमातून सुरू केला आहे.

येत्या ऑगस्ट महिन्यात भारत राष्ट्र समिती पक्षाच्या जिल्ह्यात भव्य मेळाव्यासाठी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडे तारीख मागण्यात आली आहे. त्यांनी ऑगस्टमध्ये तारीख देण्याचे कबूल केल्याची माहिती घनश्याम शेलार यांनी दिली. महाराष्ट्रातील हा सर्वात असा मोठा भव्यदिव्य मेळावा असेल, त्यासाठी लवकरच तयारी सुरू होणार आहे.

2019 पासून महाविकास आघाडी सरकारचा कारभार, पुढे शिवसेना आणि नुकतेच झालेले राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंड, कांद्यासह इतर शेतमालाचे कोसळलेले भाव, हमी भाव, पीक विमाबाबत शेतकर्‍यांच्या अनेक तक्रारी या राजकीय पार्श्वभूमीवर गेल्या चार वर्षांत शेतकर्‍यांच्या पदरात सरकारने काय टाकले, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे. शेतकरी वर्ग या सर्व पक्षांच्या राजकारणाला वैतागला आहे. त्यामुळे शेतकरीही पर्यायाच्या शोधात असल्याचा फायदा भारत राष्ट्र समिती पक्षाला होईल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात दिग्गज नेत्यांचा बीआरएस होणार प्रवेश
येत्या ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात होणार्‍या मेळाव्यानिमित्ताने सहकारात मोठे नाव असलेल्या अनेक तालुक्यातील दिग्गज नेत्यांचा बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. यात काही मोठ्या नेत्यांचा समावेश असेल, असे बोलले जाते.

हे ही वाचा : 

नगर : राज्यस्तरीय समितीची मढीला भेट

पुणे : कुपोषणमुक्तीसाठी हवी व्यापक जनजागृती

 

Back to top button