पुणे : पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघामध्ये भाजपने पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला. तरीदेखील राज्यात महाविकास आघाडीच्या जागा मोठ्या संख्येने येतील, असा दावा त्यांनी या वेळी केला. बारामती मतदारसंघात पैशाचे वाटप झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. त्यासंदर्भात विचारणा केल्यावर चव्हाण बोलत होते. काँग्रेस भवनमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेला विदर्भातील आमदार, तसेच शहराध्यक्ष
अरविंद शिंदे उपस्थित होते.
या वेळी एमआयएमच्या माजी नगरसेविका अश्विनी लांडगे आणि डॅनियल लांडगे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाण म्हणाले, भाजपने निवडणूक रोखे आणि अन्य माध्यमातून विविध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात निधी जमा केला. त्याचा वापर सरकार पाडण्यासाठी, तसेच मते खरेदी करण्यासाठी करण्यात आला. मात्र, भाजपाने पैशाचा कितीही वापर केला, तरी बहुमत इंडिया आघाडीलाच मिळणार आहे. राज्यातही महाविकास आघाडीच्या जागा अधिक प्रमाणात निवडून येतील. महाराष्ट्रात बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, मोदी यांनी 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात सहा सभा घेतल्या होत्या, या वेळी पहिल्या तीन टप्प्यातच त्यांच्या बारा सभा झाल्या.
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लाट आहे. निवडणुकीच्या प्रारंभी भाजपने 370 जागा, तसेच चारशे पारची घोषणा केली. आता ते त्याचा उल्लेखही करीत नाहीत. देशाची घटना बदलण्यासाठी त्यांना लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत हवे होते. मोदी यांनी दहा वर्षांच्या कामकाजावर आणि पुढे काय करणार यावर मते मागणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्याकडे मुद्दे नसल्यानेच त्यांना राहुल गांधी व काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलण्याची वेळ आली आहे. मोदींच्या सभांना राज्यात प्रतिसाददेखील नाही. पैसे देऊन माणसे बोलवण्याची वेळ आली आहे. चव्हाण म्हणाले की, मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर पुण्यात केलेली टीका चुकीची होती. हिंदू संस्कृतीमध्ये असे बोलले जात नाही. या टीकेमुळे मतदार नाराज झाले.
हेही वाचा