पाचवीचे सेमी इंग्रजी परिसर अभ्यास पुस्तक मराठीत | पुढारी

पाचवीचे सेमी इंग्रजी परिसर अभ्यास पुस्तक मराठीत

वर्षा कांबळे

पिंपरी(पुणे) : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे (पुणे) सेमी इंग्रजीच्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील परिसर अभ्यास -1 या पुस्तकाची छपाई इंग्रजीतून केली जात होती; मात्र शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हाती यंदा मराठी भाषेतील पुस्तक पडले आहे. त्यामुळे शिक्षकांना शिकविणे आणि विद्यार्थ्यांना शिकणे अवघड जात आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. ही बाब फक्त शहरापुरती मर्यादित नसून, राज्यभरातील विद्यार्थ्यांची स्थिती आहे.

शासनातर्फे समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. त्यामध्ये मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमांच्या अनुदानित शाळांचा समावेश असतो. मागील शैक्षणिक वर्षापर्यंत सेमी इंग्रजीच्या पाचवीतील विद्यार्थ्यांना परिसर अभ्यास हे इंग्रजीतील पुस्तक मोफत पाठ्यपुस्तकांमध्ये दिले जात नाही. त्यामुळे हे पुस्तक दुकानातून विकत घ्यावे लागत होते. गेल्या वर्षापर्यंत हे पुस्तक दुकानात उपलब्ध होते. मात्र, यंदा दुकानामध्येदेखील हे पुस्तक उपलब्ध नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे, हा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

शिक्षक घेताहेत जुन्या पुस्तकाचा आधार

शाळांमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी नव्या पुस्तकांचे वाटप केले जाते. या वर्षी दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी सर्व विषयाचे एकच पुस्तक छापून त्याचे सत्रानुसार चार भाग करण्यात आले आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात परिसर अभ्यास हे पुस्तक मराठीमध्ये छापून आले असल्याने विद्यार्थ्यांना विज्ञान शिकणे अवघड झाले आहे.

तर शिक्षक हे जुन्या पुस्तकाचा आधार घेऊन शिकवित आहेत. इंग्रजीतील पुस्तक दुकानातदेखील उपलब्ध नसल्याने सगळा सावळा-गोंधळ निर्माण झाला आहे. राज्यभरात सेमी इंग्रजीच्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना बालभारतीकडून अशा पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. मराठीतील छपाईमुळे प्रत्येक गोष्टीचे इंग्रजीतील नाव, ग्रह, तारे यांची नावे विद्यार्थ्यांना लिहून द्यावी लागत आहेत. प्रत्येक गोष्टीची नावे इंग्रजीमध्ये लिहिणे शिक्षकांना कठीण जात आहे. तर विद्यार्थ्यांना समजून घेणेदेखील अवघड होत आहे.

मग, सेमी इंग्रजीला अर्थ काय?

पुस्तक मराठीतून छापून आले आहे. इंग्रजी पुस्तक हवे असेल, तर दुकानातून विकत घ्यावे लागेल. पण दुकानामध्येदेखील पुस्तक उपलब्ध नाही. कारण इंग्रजीच्या पुस्तकाची छपाई नाही, असे दुकानदार सांगतात. शासन निर्णयात मराठीतूनच परिसर अभ्यास शिकविला जावा, असे असेल तर मग सेमी इंग्रजीला अर्थ काय, असा प्रश्न पालक आणि शिक्षकांतून विचारला जात आहे.

पुस्तक महामंडळाचे काम पुस्तकाची निर्मिती करणे हे आहे. मुलांना इयत्ता तिसरीपासून इंग्रजीची ओळख पाहिजे. सर्व शिक्षक व पालकांची मागणी आहे की, गणितासारखे विज्ञानही इंग्रजीमध्ये छापून यावे. आम्ही संघटनेचे पत्र बालभारतीला देणार आहोत.

-प्राचार्य विक्रम काळे, श्रीमती गेंदीबाई चोपडा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज

मागच्या वर्षापर्यंत ही सगळी पुस्तके वेगवेगळी होती. त्या वेळी शाळा आपल्या पद्धतीने त्यांना हवे ते पुस्तक घेत होते. शासन निर्णयानुसार सेमी इंग्रजी माध्यमातील इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीला परिसर अभ्यासाचा विषय मराठीतून शिकवायचा असल्याने ते एकत्रित बांधणी करताना मराठीमध्ये छापले आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजीतून पुस्तक हवे असल्यास त्यांनी ते बाहेरून विकत घ्यावे.

– कृष्णकुमार पाटील, संचालक, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे

Back to top button