पुणे ग्रामीण पोलिसांच्या ‘या’ कामामुळे होतंय सर्वत्र कौतुक | पुढारी

पुणे ग्रामीण पोलिसांच्या 'या' कामामुळे होतंय सर्वत्र कौतुक

तळेगाव ढमढेरे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण चौकात भला मोठा खड्डा पडल्याने अनेक लहान-मोठे अपघात होत होते. खड्ड्यामुळे मोठी वाहतूक कोंडीही होत होती. ही बाब लक्षात येताच शिक्रापूर पोलिस स्टेशनचे कर्मचारी अंबादास थोरे यांनी भरपावसात फावडा घेऊन खड्डा बुजविल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

राज्यमार्ग क्रमांक 55 या शिक्रापूर-चाकण रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मुख्य चौकातच भला मोठा खड्डा पडला होता. यापूर्वी काही स्थानिकांनी तो बुजविला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाला लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. सध्या पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावर पाणी साचून तो खड्डा दिसत नसल्याने अनेक वाहने खड्ड्यात आदळून अपघात होत होते.

वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. ही बाब लक्षात येताच वाहतूक पोलिस कर्मचारी अंबादास थोरे यांनी तातडीने काही सहकार्‍यांच्या मदतीने खडी, दगड, विटा, पेव्हिंग ब्लॉक आणून भरपावसामध्ये फावडा घेऊन रस्त्यावर साचलेले व डबक्यातील पाणी बाजूला काढत हा खड्डा बुजविला. थोरे यांचे हे अनोखे काम अनेक नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रित करून सोशल मीडियावर प्रसारित केले. थोरे यांच्या या कार्याचे शिक्रापूरसह परिसरातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

हेही वाचा

पंढरीच्या वारीत पुण्यातील नांदेडकर दिंडी स्वच्छतेत दुसरी

हडपसर : ससाणेनगर भागातील रस्त्यांची दुरवस्था

Back to top button