हडपसर : ससाणेनगर भागातील रस्त्यांची दुरवस्था | पुढारी

हडपसर : ससाणेनगर भागातील रस्त्यांची दुरवस्था

हडपसर; पुढारी वृत्तसेवा : ससाणेनगर येथील भारत फोर्ज सोसायटी ते नवनाथ चौकापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण अर्धवट केले आहे. तसेच परिसरातील अंतर्गत रस्त्यांचीदेखील दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याने वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होत आहे. या रस्त्यांची कामे तातडीने करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

महापालिकेने भारत फोर्ज सोसायटी ते नवनाथ चौकादरम्यानच्या अर्ध्या रस्त्याचे काही दिवसांपूर्वी डांबरीकरण केले आहे. मात्र, अर्ध्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या रस्त्यावर असमतोल निर्माण झाल्याने छोटे, मोठे अपघात होत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे डांबरीकरण केलेल्या रस्त्याचीदेखील दुरवस्था होण्याची शक्यता आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डेदेखील पडले आहेत. परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत गेल्या काळात जलवाहिन्या टाकल्या आहेत.

या जलवाहिन्यांतून नागरिकांना नळ जोड देण्यात आले आहेत. यासाठी मधोमध खोदल्यामुळे या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.
परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाने या रस्त्यांची कामे अद्यापही केली नाहीत. यामुळे परिसरातील वाहनचालक,नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. महापालिकेचे सर्व कर भरूनसुद्धा रस्त्यांच्या कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. ससाणेनगर परिसरात रस्त्याचे अर्धवट डांबरीकरण केल्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.

नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा

ससाणेनगर परिसरात जलवाहिन्यांसाठी खोदण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्यांची महापालिकेने तातडीने दुरुस्ती करावी. तसेच भारत फोर्ज सोसायटी ते नवनाथ चौकादरम्यानच्या रस्त्याचे अर्धवट राहिलेले डांबरीकरणदेखील तातडीने पूर्ण करण्यात यावे. अन्यथा, नागरिकांच्या वतीने महेश ससाणे यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

ससाणेनगर परिसरातील रस्त्यांची पाहणी करण्यास पथ विभागाच्या अधिकार्‍यांना सांगितले आहे. या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येईल.

-प्रसाद काटकर,
सहायक आयुक्त, हडपसर क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

पुण्यातील ‘त्या’ युवकांना मुख्यमंत्र्यांच्यावतीने 15 लाख रुपयांची बक्षिसे सुपूर्त

Ashes 2023 : ‘बॅझबॉल’ची अग्निपरीक्षा! बेन स्टोक्सवर इंग्लंडच्या विजयाची मदार

Back to top button