पुणे : मेट्रोमुळे अरुंद झालेला ‘बीआरटी’ काढणार | पुढारी

पुणे : मेट्रोमुळे अरुंद झालेला ‘बीआरटी’ काढणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नगर रस्त्यावर मेट्रो प्रकल्पामुळे अरुंद झालेला बीआरटी मार्ग काढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उर्वरित मार्गावर आणखी सुविधा देऊन बीआरटीचा प्रवास सुरळीत करण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग काढण्याची मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी लावून धरली आहे. महापालिकेने गतआठवड्यात काही मार्ग प्रायोगिक तत्त्वावर काढण्याच्या कामास सुरुवात केली होती.

मात्र, स्वयंसेवी संस्थांनी त्यास विरोध दर्शविला होता. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी महापालिकेने पोलिस, पीएमपीएमएल यांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार व विकास ढाकणे, वाहतूक पोलिस उपायुक्त विजय मगर, पीएमपीचे बीआरटी व्यवस्थापक अनंत वाघमारे आदी उपस्थित होते. या वेळी बीआरटीचा मार्ग सरसकट न काढता ज्या ठिकाणी बीआरटी मार्गात मेट्रोचे पिलर येऊन मार्ग खंडित आणि अरुंद झाला आहे, अशाच ठिकाणचा मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रामुख्याने गुंजन चौकाच्या सुरुवातीला तसेच रामवाडी ते नोवाटेल हॉटेलच्या समोर मेट्रोच्या खांबामुळे काही ठिकाणी बीआरटी मार्ग खूपच अरुंद झाला आहे. दोन फुटांपेक्षाही कमी अंतर आहे. त्यामुळे या मार्गातून बस जाऊच शकणार नाही. असा अडथळा असलेला हा मार्ग वापरता येणार नसल्याने तो काढण्यात येणार आहे.

तसेच उर्वरित बीआरटी मार्गाची दुरुस्ती, स्थानकांवर प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा, बीआरटी मार्गातील इतर वाहनांवर कारवाई करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली. आरटी मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. खासगी वाहने या मार्गातून गेल्यास त्याला दंड आकारला जाईल. त्यामुळे बीआरटी मार्गातील खासगी वाहनांची घुसखोरी रोखली जाणार आहे.

हेही वाचा

पुणे : खंडणीविरोधी पथकाची तीन सावकारांवर कारवाई

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग

पुण्यात सलग चौथ्या दिवशी पाऊस; दिवसभर रिमझिम

Back to top button