पुणे : खंडणीविरोधी पथकाची तीन सावकारांवर कारवाई | पुढारी

पुणे : खंडणीविरोधी पथकाची तीन सावकारांवर कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा : व्यावसायिक आणि नोकरदारांकडून अधिक दराने व्याज घेणार्‍या आणि खंडणीची मागणी करणार्‍या खासगी सावकारांवर खंडणीविरोधी पथकाने कारवाई केली. याप्रकरणी विश्रामबाग आणि खडक पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दूध डेअरी व्यावसायिक आदेश राजू पवार (रा. महर्षीनगर, गुलटेकडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विनापरवाना सावकारी व्यवसाय करणारे यश संजय मेमाणे व मानव संजय मेमाणे (दोघे रा. न्यू रविवार पेठ) यांच्यावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने त्यांच्याकडून 1 लाख 90 हजार रुपये दरमहा 10 टक्के व्याजदराने घेतले होते.

या बदल्यात टेम्पो सावकारांकडे गहाण ठेवला होता. त्यानंतर सावकारांना गुगल पे व रोख स्वरूपात असे मिळून 1 लाख 71 हजार रुपये व्याज देऊन गहाण ठेवलेला टेम्पो परत मागितला. मात्र, तो न देता सावकारांनी आणखी 2 लाख रुपयांची अवाजवी मागणी केली. ती न दिल्यामुळे तक्रारदाराला शिवीगाळ, मारहाण करून स्मार्ट वॉच काढून घेतले, अशी फिर्‍याद होती. पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक चांगदेव सजगने, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलिस अंमलदार विजय गुरव, सुरेंद्र जगदाळे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, चेतन आपटे, पवन भोसले, किशोर बर्गे, प्रदीप गाडे यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी संबंधित पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.

दहापट पैसे देऊनही धमकी

तक्रारदार प्रसाद अशोक मोटे (रा. शनिवार पेठ) यांनी होम लोन व मॉर्गेज लोनचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विनापरवाना सावकारी व्यवसाय करणारा सावकार सुरज मनोज परदेशी (रा. खोपडेनगर, कात्रज) याच्याकडून शनिवारवाडा चौपाटी, शनिवार पेठ, पुणे येथे एकूण 45 हजार रुपये दरमहा 20 टक्के व्याजदराने घेतले होते.

त्या मोबादल्यात गुगल पे व फोन पेव्दारे परदेशीला 4 लाख रुपये ऑनलाइन व 50 हजार रुपये रोख स्वरूपात असे एकूण 4 लाख 50 हजार रुपये दिले होते. तरीही परदेशीने तक्रारदाराला वारंवार फोन करून व भेटून, शिवीगाळ करीत बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच व्याज व मुद्दल अशा एकूण 1 लाख 53 हजार रुपयांची मागणी केली. त्याच्याविरुध्द विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग

पुण्यात सलग चौथ्या दिवशी पाऊस; दिवसभर रिमझिम

समान नागरी कायदा विधेयक पावसाळी अधिवेशनात शक्य

Back to top button