राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग | पुढारी

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नाराजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलला जाण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून अजित पवार अस्वस्थ आहेत. ज्येष्ठ असतानाही आपल्याला पक्षात डावलले जात असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. मुख्यमंत्रिपदाची संधी असतानाही पक्षाने ते पद आपल्याला मिळू दिले नाही. विविध मंत्रिपदे भोगलेल्या अजित पवार यांना अनिल देशमुख यांच्यानंतर गृहमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता वाटत होती. मात्र, शेवटच्या क्षणी या पदाची माळ अनपेक्षितपणे दिलीप वळसे-पाटील यांच्या गळ्यात घातली गेली.

मागील तीन वर्षांपासून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर जयंत पाटील आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची जबाबदारी दिलेल्या कार्याध्यक्ष सुळे यांच्याकडून त्यांच्या मर्जीतील व्यक्ती प्रदेशाध्यक्षपदावर बसविण्याची भीती अजित पवार यांना वाटत आहे. एकदा ही संधी निघून गेल्यावर पक्षावर कमांड ठेवण्याची वेळ निघून जाईल, असाही धोका वाटत असल्यामुळे अजित पवार यांची प्रदेशाध्यक्षपदावर नजर आहे. त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केल्यापासून राष्ट्रवादीमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. शुक्रवारी जयंत पाटील यांनी थेट पवार यांची भेट घेतल्यामुळे आता पक्षातील पदाधिकार्‍यांचे बदलाकडे लक्ष लागले आहे.

Back to top button