पिंपरी : डॉक्टर महिलेला लुटणार्‍या दोघांना अटक ; युनिट चारची कारवाई | पुढारी

पिंपरी : डॉक्टर महिलेला लुटणार्‍या दोघांना अटक ; युनिट चारची कारवाई

पिंपरी : डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कारवाई केली. बुद्धदेव विष्णू बिश्वास (24, रा. पश्चिम बंगाल), मिंटू मिहीर बिश्वास (26, रा. भोसरी, पुणे. मूळ रा. पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबर 2022 रोजी एक महिला दवाखान्यातून उपचार घेऊन दुचाकीवरून घरी जात होती. दरम्यान, कासारसाई येथील संत तुकाराम साखर कारखान्याजवळ एका व्यक्तीने महिलेला मारहाण करीत तिचे सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर दागिने चोरून नेले.

त्यानंतर 4 फेब्रुवारी 2022 रोजी 26 वर्षीय डॉक्टर तरुणी तिच्या क्लिनिकमध्ये असताना दोघांनी क्लिनिकमध्ये घुसून डॉक्टर तरुणीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटले. या गंभीर घटनांची दखल घेत पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेने या प्रकरणांचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. आरोपी प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करत असल्याने त्यांना पकडणे अवघड होते. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींची माहिती काढली. त्यानंतर 7 जून रोजी दोन्ही आरोपी हिंजवडी परिसरात आल्याची माहिती पोलिस अंमलदार तुषार शेटे आणि प्रशांत सैद यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी दोन पथके तयार केली. हिंजवडीत सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपींनी कासारसाई आणि हिंजवडी येथील क्लिनिकमधील महिलांना लुटले असल्याची कबुली दिली. तसेच, देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन, शिरगाव, तळेगाव, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक एक गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले. या कारवाईमुळे सात गुन्हे उघडकीस आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलिस उपनिरीक्षक गणेश रायकर, सहायक फौजदार दादा पवार, नारायण जाधव, संजय गवारे, आदिनाश मिसाळ, पोलिस अंमलदार प्रवीण दळे, रोहिदास आडे, तुषार शेटे, मोहम्मद गौस रफिक नदाफ, वासुदेव मुंडे यांनी ही कारवाई केली.

हे ही वाचा :

कॅश व्‍हॅनमधून लुटली तब्‍बल सात कोटींची रोकड! पंजाबमधील धक्‍कादायक घटना

पिंपरी : नेहरूनगरमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून

 

Back to top button