MS Dhoni : धोनीचा ‘तो’ षटकार सीएसकेला पडला महागात, जाणून घ्या नेमकं कारण | पुढारी

MS Dhoni : धोनीचा ‘तो’ षटकार सीएसकेला पडला महागात, जाणून घ्या नेमकं कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क : MS Dhoni : आयपीएल 2024 मधून चेन्नई सुपर किंग्ज संघाचा प्रवास संपुष्टात आला. शनिवारी (18 मे) रात्री झालेल्या सामन्यात सीएसकेचा पराभव करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना सीएसकेला विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य दिले. सामना जिंकता आला नसता तरी चेन्नईला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी केवळ 201 धावा करायच्या होत्या. पण त्यांना 20 षटकात 7 बाद 191 धावाच करता आल्या.

सामना संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवासाठी महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) जबाबदार धरले जात आहे. वास्तविक, धोनीने 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गोलंदाज यश दयाल याला षटकार खेचला. त्याने हा चेंडू स्टेडियम बाहेर भिरकावला. त्यामुळे चेंडू बदलावा लागला आणि तिथून सामन्याला वेगळे वळण मिळाले.

चेन्नई सुपर किंग्जला प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती. क्रिजवर धोनी आणि रवींद्र जडेजा होते. ही जोडी सीएसकेसाठी कहीतरी चमत्कार करणार अशी आशा सर्व चाहत्यांना होती. त्याचवेळी आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसीने शेवटच्या षटकासाठी यश दयालच्या हाती चेंडू सोपवला.

यश दयालने पहिलाच चेंडू फुल टॉस टाकला जो स्ट्राईकवर असणा-या धोनीने फाइन लेगच्या दिशेने मारून स्टेडियमच्या बाहेर पाठवला. माहीच्या (MS Dhoni) बॅटमधून आलेला हा 110 मीटरचा स्पर्धेतील सर्वात लांब षटकार ठरल. चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेल्याने पंचांना दुसरा चेंडू वापरावा लागला. यानंतरच्या पुढच्याय चेंडूवर यश दयालने धोनीला पुन्हा तसाच षटकार खेचण्यासाठी प्रवृत्त केले. पण यावेळी मात्र धोनी जाळ्यात अडकला. स्वप्निल सिंहने सीमारेषेवर त्याचा झेल पकडला ज्यामुळे सीएसकेचा पराभव पक्का झाला. दयालने पहिल्या चेंडूवरील षटकाराव्यतिरिक्त पुढील पाच चेंडूत केवळ 1 धाव खर्च केली. ज्यानंतर आरसीबीने विजय मिळवून प्लेऑफचे तिकीट पक्के केले.

आरसीबी (RCB) करत होती चेंडू बदण्यासाठी मागणी…

आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली बराच वेळ पंचांना चेंडू बदलण्याची मागणी करत होते. खरे तर सामना सुरू असताना आलेल्या पावसामुळे जेव्हा जेव्हा चेंडू सीमारेषेबाहेर जात होता तेव्हा चेंडू ओला व्हायचा. अशा स्थितीत गोलंदाजांना चेंडू पकडणे कठीण जात होते. चेंडू ओला झाल्यामुळे 19 व्या षटकात जे लॉकी फर्ग्युसनने फेकले होते त्यात दोन षटकार मारण्यात सीएसके फलंदाजांना यश आले होते.

दयालला चांगली पकड मिळाली

पण 20 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने (MS Dhoni) मारलेल्या षटकारामुळे चेंडू बदलावा लागला. ज्याचा आरसीबीला फायदा झाला. यश दयालने पुढचे 5 चेंडू बॅक ऑफ द हँड स्लोअर टाकले. ओला नसल्याने हा चेंडूवर दयालला चांगली पकड करता आली.

कार्तिकची कबुली

आरसीबीचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनेही धोनीच्या षटकारामुळे सामना फिरल्याची कबुली दिली. ‘आज घडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे धोनीने चेंडू मैदानाबाहेर मारला, त्यानंतर आम्हाला एक नवीन चेंडू मिळाला ज्यामुळे गोलंदाजी करणे सोपे झाले,’ असे कार्तिक आरसीबी ड्रेसिंग रूममध्ये म्हणाला.

Back to top button