पिंपरी : गहुंजे व शिवणे बंधार्‍यासाठी 29 कोटी खर्च ; महापालिका टप्प्याटप्प्याने रक्कम देणार | पुढारी

पिंपरी : गहुंजे व शिवणे बंधार्‍यासाठी 29 कोटी खर्च ; महापालिका टप्प्याटप्प्याने रक्कम देणार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पवनानदीवर मावळ तालुक्यातील गहुंजे व शिवणे येथे कोल्हापूर पद्धतीचा नवा बंधारा व पूल बांधण्यात येत आहे. हे काम पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. गहुंजे बंधार्‍याचे काम 20 टक्के आणि शिवणे बंधार्‍याचे काम 35 टक्के इतके झाले आहे. त्यासाठी एकूण 28 कोटी 78 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. हा खर्च पाटबंधारे विभागास टप्प्याटप्प्याने देण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

पवनाधरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याच्या महापालिकेच्या प्रकल्पाविरोधात भारतीय किसान संघाने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने 19 ऑक्टोबर 2010 ला फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आणि पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता तथा प्राथमिक विवाद निवारण अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात भारतीय किसान संघाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे अपिल केले होते. अपिलावर सुनावणी होऊन प्राधिकरणाने 16 जून 2022 ला आदेश दिला. प्राधिकरणाने पालिकेच्या पवना बंद जलवाहिनी प्रकल्पास मान्यता दिली. भारतीय किसान संघ व इतरांचे अपिल फेटाळले.

प्राधिकरणाने पवना नदीवर कोल्हापूर पद्धतीचे दोन बंधारे महापालिकेने स्वत:च्या खर्चाने बांधण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, महापालिकेकडून गहुंजे व शिवणे येथे बंधारा व पूल बांधण्यात येत आहे. गहुंजे बंधार्‍यासाठी 16 कोटी 63 लाख आणि शिवणे बंधार्‍यासाठी 12 कोटी 16 लाख इतका असा एकूण 28 कोटी 78 लाख खर्च अपेक्षित आहे. हा निधी खडकवासला पाटबंधारे विभागास देण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाने दोन्ही बंधार्‍यांचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू केले आहे. त्यासाठी लागणारी रक्कम पाटबंधारे विभागास टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे.

आतापर्यंत गहुंजे बंधार्‍याचे काम 20 टक्के आणि शिवणे बंधार्‍याचे काम 35 टक्के इतके झाले आहे. पाटबंधारे विभागाने मागणी केल्यानुसार 5 कोटी 50 लाखांच्या रकमेचा धनादेश दिला जाणार आहे. काम जसेजसे पूर्ण करण्यात येणार आहे, त्यानुसार, पाणीपुरवठा विभागाकडून पाटबंधारे विभागास रक्कम दिली जाणार आहे. दोन्ही बंधारे व पुलाचे काम यासाठी एकूण 28 कोटी 78 लाख रुपयांच्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

मनपा अर्थसंकल्पात 15 कोटींची तरतूद
मनपा अर्थसंकल्पात 15 कोटींची तरतूद बंधार्‍याच्या कामासाठी महापालिकेने सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात 15 कोटींची तरतूद केली आहे. बंधार्‍याचे सर्वेक्षण करण्यासाठी 7 लाख, भूशास्त्रीय कामासाठी 7 लाख 70 हजार, बंधार्‍याच्या बांधकामासाठी सल्लामसलत व संकल्पना करण्यासाठी 36 लाख 4 हजार 900 असा एकूण 50 लाख 74 हजार 900 रुपयांच्या खर्चाची रक्कम महापालिकेने 5 नोव्हेंबर 2012 ते 16 ऑक्टोबर 2020 या कालावधीत दिली आहे. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने पाटबंधारे विभागास देण्यात येणार आहे.

Back to top button