आई पुण्याची, वडील पाकिस्तानी… काडीमोड झाल्याने तीन मुले झाली निराधार | पुढारी

आई पुण्याची, वडील पाकिस्तानी... काडीमोड झाल्याने तीन मुले झाली निराधार

महेंद्र कांबळे

पुणे : आई पुण्याची, वडील पाकिस्तानी. दोघे नातेवाईक असल्याने काही वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. दुबईत स्थायिक झाले. तीन मुलेही झाली. मात्र, काही कारणाने दोघांचा काडीमोड झाला. आई दुबईतच राहिली. वडील पाकिस्तानात गेले. मुले निराधार झाली. पुण्यात आजीकडे आली. मात्र, पाकिस्तानी नागरिकत्व असल्याने मोठ्या मुलाला खडक पोलिसांनी अटक केली. लहान बहीण-भावांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले. अखेर पुणे न्यायालयाने अटकेत असलेल्या मुलाला जामीन दिला अन् लहान भावंडांचा जीव भांड्यात पडला.

ही कहाणी आहे, आई, वडील व निराधार झालेला तीन भावंडांची. काही वर्षांपूर्वी पुणे येथील तरुणीचे पाकिस्तानी तरुणाशी लग्न झाले. ते दोघेही नातेवाईक त्यामुळे त्यांनी लग्न करून दुबईत संसार थाटला. तीन मुले झाली. मात्र, काही कारणाने आई-वडिलांचा काडीमोड झाला. तिन्ही मुले पुण्यात आजीकडे आली. येथे शाळेत शिकू लागली. मात्र दुर्दैवाने आजीचे निधन झाल्याने ती मुले पुन्हा निराधार झाली. त्यामुळे मुलांनी खटपट करून आईकडे जाण्याचा निर्णय घेतला.

व्हिसासाठी अर्ज केला, तेव्हा मुले पाकिस्तानी नागरिक असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मोठा मुलगा 22 वर्षांचा असल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली. 23 मार्चपासून तो अटकेत. त्याचे बहीण-भाऊ हैराण झाले. बहीण 15 वर्षांची, तर लहान भाऊ 13 वर्षांचा त्यांनी हिमतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पाकिस्तानी दुतावासाला पत्र लिहिले. हे सर्व प्रकरण सत्र न्यायालयात सुनावणीस आले असता 60 दिवसांत आरोपपत्र दाखल न केल्याने खडक पोलिसांना न्यायालयाने ‘कारणे दाखवा’ नोटीस काढत अटकेत असलेल्या मुलाला डीफॉल्ट जामीन मंजूर केला.

पुराव्याशी छेडछाड नको

जामीन देताना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंदारे यांच्या समोर हे प्रकरण सुनावणीस आले असता न्यायालयाने आदेश दिले की, अटकेतील मुलाने पुराव्यांशी छेडछाड करू नये. फोटो आणि कायमचा पत्ता पोलिस ठाण्यात द्यावा. न्यायालयाच्या परवानगीशिवाय पुणे शहर सोडू नये. प्रत्येक सोमवारी खडक पोलिस ठाण्यात हजेरी लावावी. दरम्यान, तपास अधिकार्‍याने संबंधित दुतावासाला कळवून पुढील योग्य ती कारवाई करावी.

हे प्रकरण अतिशय संवेदनशील व गुंतागुंतीचे आहे. आई पुण्याची, वडील पाकिस्तानी, पण ते दोघे नातेवाईक असल्याने त्यांचा विवाह झाला. दुबईत संसार झाला. मुलेही झाली. पण काही कारणाने काडीमोड होताच मुले आजीकडे आली. त्यांचे नागरिकत्व पाकिस्तानी असल्याने, खडक पोलिसांनी मोठ्या मुलाला अटक केली. कारण दुसरी दोन भावंडे अल्पवयीन होती. हे प्रकरण न्यायालयात येताच मुदतीत आरोपपत्र दाखल न केल्याने अटकेतील मुलाला न्यायालयाने जामीन दिला. दोन भावंडांनी हिमतीने गृहमंत्री शहा यांना पत्रही लिहीत आपली व्यथा मांडली आहे.

– अ‍ॅड. जहीर खान पठाण
पाकिस्तानी मुलाचे वकील.

हेही वाचा

Iga Swiatek : अव्वल मानांकित इगा स्वायटेक उपांत्य फेरीत

Messi : पीएसजीनंतर आता लियोनेल मेस्सी इंटर मियामीकडून खेळणार

Back to top button