Lok Sabha Election 2024 | महायुतीच्या प्रचार गीतात मनोज जरांगेंची छबी, मराठा आरक्षण दिल्याचा उल्लेख

Lok Sabha Election 2024 | महायुतीच्या प्रचार गीतात मनोज जरांगेंची छबी, मराठा आरक्षण दिल्याचा उल्लेख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महाराष्ट्रात आतापर्यंत लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले असून, शेवटचा अन् पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या सोमवारी (दि. २०) होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी जोर लावला जात असून, यामध्ये महायुतीचे प्रचारगीत चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे कारणही तसेच असून, या गीतात चक्क मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांचीही छबी दिसून येत आहे. महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे या गीतातून सांगितले जात आहे. (Lok Sabha Election 2024)

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची नेमकी भूमिका काय, याविषयी अगोदरच मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. 'ज्याला पाडायचे त्याला पाडा' असा स्पष्ट संदेश मराठा समाजाला देताना, त्यांनी महायुती आणि मविआ या दोघांपैकी कोणासही पाठिंबा जाहीर केला नाही. अशात महायुतीच्या प्रचार गीतात त्यांची छबी झळकत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. महायुतीचे हे प्रचारगीत सध्या सर्वत्र वाजविले जात असून, सोशल मीडियावरदेखील या गीताचा बोलबाला आहे. गीतामध्ये महायुती सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन दाखविले जात आहे. ३ मिनिट १८ सेकंदांच्या या गीतात एक मिनिटाच्या अंतरावर मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झळकत असून, महायुती सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा दावा केला जात आहे. मनोज जरांगे जेव्हा मराठा समाजाचे वादळ घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. यावेळी मराठा समाजाने आपले आंदोलन मागे घेतले होते. याच घटनेतील दृश्य प्रचार गीतात दाखविले जात आहे. (Lok Sabha Election 2024)

आम्ही समर्थन करत नाही, मराठा समाजाचे म्हणणे

दरम्यान, या दृश्याला मराठा समाजाने अद्याप आक्षेप घेतला नसला तरी, या गीतातील दृश्याचे आम्ही समर्थन करीत नसल्याचे मराठा समाजाचे म्हणणे आहे. तसेच जरांगे-पाटील यांनी कोणासही पाठिंबा देणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठा समाज सुज्ञ असून, अशा प्रकारच्या गीतातील दृश्यावर भाळून जाणार नसल्याचे मराठा समाजाकडून सांगण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news