Iga Swiatek : अव्वल मानांकित इगा स्वायटेक उपांत्य फेरीत | पुढारी

Iga Swiatek : अव्वल मानांकित इगा स्वायटेक उपांत्य फेरीत

पॅरिस; वृत्तसंस्था : जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित इगा स्वायटेकने फ्रेंच टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत अमेरिकेच्या कोको गॉफला सरळ सेटसमध्ये पराभूत करत महिला एकेरीत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. स्वायटेकने सहाव्या मानांकित गॉफला उपांत्यपूर्व फेरीत 6-4, 6-2 अशा फरकाने मात दिली. कोको गॉफ या स्पर्धेतील गत उपविजेती राहिली असून यंदा मात्र तिला लवकरच गाशा गुंडाळावा लागला आहे. आता उपांत्य फेरीत स्वायटेकसमोर ब—ाझीलच्या बेट्रिझचे आव्हान असणार आहे. (Iga Swiatek)

2020 व 2022 मध्ये फ्रेंच ग्रँडस्लॅम जिंकणार्‍या स्वायटेकने आता गॉफविरुद्ध आपली कामगिरी 7-0 अशी आणखी भरभक्कम केली आहे. स्वायटेक-गॉफ यांच्यातील उपांत्यपूर्व लढत केवळ 1 तास 28 मिनिटात निकाली झाली. अमेरिकन टिनेजर गॉफने पूर्ण प्रयत्न केले असले तरी तिला यात अजिबात यश लाभले नाही. रोलँड गॅरोसवर स्वायटेकचा हा सलग 12 वा विजय असून तिने स्पर्धेतील रेकॉर्ड 26-2 असे सरस राखले आहे. 22 वर्षीय स्वायटेक या स्पर्धेत सलग 12 सामने जिंकणारी चौथी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. यापूर्वी मोनिका सेलेस, स्टेफी ग्राफ व ख्रिस इव्हर्ट यांनाच यापेक्षा अधिक सरस कामगिरी साकारता आली आहे. (Iga Swiatek)

या लढतीबद्दल बोलताना स्वायटेक म्हणाली, गॉफने येथील वातावरणाचा लाभ घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळे येथे विजय मिळवणे अजिबात सोपे नव्हते. विशेषत: पहिला सेट तर अधिक आव्हानात्मक होता. उपांत्यपूर्व फेरीचे सामने अर्थातच कठीण असतात. आज जिंकू शकले याचा मला आनंद आहे. पुढील लढतीत मी अधिक तयारीने उतरेन.

हेही वाचा;

Back to top button