Messi : पीएसजीनंतर आता लियोनेल मेस्सी इंटर मियामीकडून खेळणार

Messi : पीएसजीनंतर आता लियोनेल मेस्सी इंटर मियामीकडून खेळणार
Published on
Updated on

बार्सिलोना; वृत्तसंस्था : अर्जेंटिनाचा 35 वर्षीय फॉरवर्ड खेळाडू लियोनेल मेस्सी कोणत्या संघाकडून खेळणार, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून लवकरच आपण इंटर मियामी संघाशी करारबद्ध होत असल्याचे त्याने जाहीर केले. एमएलएस व मियामी यांनी सोशल मीडियावर या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी अद्याप अंतिम करार होणे बाकी असल्याचे म्हटले आहे. माजी इंग्लिश आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमच्या सहमालकीचा हा संघ आहे. (Messi)

मेस्सीने शनिवारी पीएसजीतर्फे आपला शेवटचा सामना खेळला. त्यानंतर तो पुन्हा बार्सिलोनाकडे वळणार की सौदी अरेबियात गलेलठ्ठ मानधनाचा करार करणार, याबद्दल उत्सुकता होती. यादरम्यान या दोन्हीकडे न वळता त्याने अमेरिकेकडे मोर्चा वळवला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मेस्सीने मागील 2 हंगामांत पीएसजी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2021 मध्ये तो बार्सिलोना संघातून पीएसजीमध्ये दाखल झाला होता. (Messi)

'मी मियामीत खेळणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. सध्या अंतिम करारावर स्वाक्षरी अद्याप केली नसली तरी लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. विश्वचषक जिंकण्यात यश आल्यानंतर आणि बार्सिलोनाकडे परतणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मी एमएलएसची निवड केली. नव्या संघातर्फेही मी त्याच उत्साहाने आणि त्याच तडफेने खेळत राहीन,' असे मेस्सी नव्या कराराची माहिती देताना म्हणाला.

जागतिक फुटबॉल वर्तुळातील दिग्गज खेळाडूंपैकी एक असणारा मेस्सी सातवेळचा बॅलॉन ओडोर विजेता असून डिसेंबर 2022 मध्ये त्याने कतारमध्ये अर्जेंटिनाला स्वप्नवत विश्वचषक विजय मिळवून दिला आहे. या आठवड्यात पीएसजीने मेस्सी क्लबला अलविदा करत असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केल्यानंतर तो कोणत्या संघाशी करारबद्ध होणार, याची उत्सुकता होती. त्यावर आता मियामीच्या रूपाने शिक्कामोर्तब झाले आहे. यापूर्वी मेस्सी मियामीत अनेकदा सुट्टीसाठीच येत असे. आता मात्र तो येथील क्लबतर्फे खेळताना दिसून येणार आहे.

इंटर मियामी संघाची स्थापना 2018 मध्ये झाली असून मागील आठवड्यातच या संघाने प्रशिक्षक फिल नेव्हिले यांची उचलबांगडी केली आहे. आदिदास व अ‍ॅपल टीव्ही हे एमएलएसचे मुख्य पुरस्कर्ते असून त्यांचाही नव्या करारात वाटा असू शकतो, असे संकेत आहेत. या महिन्याच्या उत्तरार्धात 36 व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या मेस्सीच्या क्लब कारकिर्दीचा प्रवास आता युरोपबाहेर असेल, हे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

फक्त पैशाचाच प्रश्न असता तर मी सौदी अरेबिया किंवा अन्य ठिकाणी गेलो असतो. पण, पैशापेक्षाही मी विश्वासाला व पारदर्शक व्यवहाराला अधिक महत्त्व देतो. मियामी संघातर्फे खेळताना मी कोणतीच कसर ठेवणार नाही, याची यानिमित्ताने ग्वाही देऊ इच्छितो.
-दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news