येरवड्यातील कष्टकरी महिलांनीही मिळवले दहावीत यश | पुढारी

येरवड्यातील कष्टकरी महिलांनीही मिळवले दहावीत यश

येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : येरवडा, लक्ष्मीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीचा भाग असल्याने या परिसरामध्ये कष्टकरी, कामगार, धुणीभांडी व घरकाम करणार्‍या महिला, कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. धुणीभांडी तसेच मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणार्‍या महिलांनी रात्रशाळेत शिक्षण घेतले आणि त्यातील 13 जणींनी चांगले गुण मिळवून दहावीच्या परीक्षेत यश मिळवले. शिक्षणात अनेक वर्षांचा खंड पडून देखील त्यांनी मिळविलेलं यश वाखाणण्याजोगे आहे.

रूपाली रणपिसे (वय 38 ) यांनी शिक्षणात खंड 23 वर्षे खंड पडूनही 65 टक्के गुण मिळवले. स्वयंपाकाचे काम, धुणीभांडी, शिवणकाम करत त्यांनी हे यश मिळवले. अनिता जैन (36) यांच्याही शिक्षणात 20 वर्षे खंड पडला होता. तरी त्यांनी दहावीत 61 टक्के गुण मिळवले. त्याही स्वयंपाकाचे काम करतात. त्याशिवाय धुण्याभांड्यासारखी कष्टाची कामे करत त्यांनी शिक्षण केले. अंजली गरड यांनी 22 व्या वर्षी दहावीची परीक्षा दिली आणि यश मिळवले. शिवणकाम सांभाळत अभ्यास करून त्यांनी प्रथम श्रेणी प्राप्प्त केली.

संगीता कांबळे यांनी 36 व्या वर्षी दहावीत यश मिळवले. शिक्षणात 18 वर्षे खंड पडूनही त्यांनी घरकाम, धुणीभांडी करत अभ्यास करून 46 टक्के गुण प्राप्त केले. मीना डोभले (39) शिक्षणात खंड 22 वर्षांचा खंड पडूनही 39 व्या वर्षी दहावीची परीक्षा देऊन 58 टक्के मिळवले. घरकाम, धुणीभांडी करत त्यांनी जिद्दीने हे यश मिळवले

स्वच्छतेचे काम करणार्‍या सुषमा काळे यांनीही शिक्षणात खंड पडलेला असताना 33 व्या वर्षी दहावीची परीक्षा देत 55 गुण मिळवले. सुनंदा वाघमारे यांनी वयच्या 34 वर्षी दहावीत 61 टक्के तर सलमा शेख यांनी 36 व्या वर्षी दहावीचा अभ्यास करून 42 टक्के मिळवले. परिचाक्षिरका असलेल्या राखी कांबळे यांनी 38 व्या वर्षी दहावीत 54 टक्के मिळवले.

गृहिणी असलेल्या ज्योती शेलरे यांनी 25 व्या वर्षी दहावीची परीक्षा देत प्रथम श्रेणी प्राप्त केली. एका संस्थेत काम करणार्‍या अनिता क्षीरसागर (वय 27) शिक्षणात खंड पडूनही दहावीत व्दितीय श्रेणी प्राप्त केली. उन्हाळे मीरा यांनी 47 व्या वर्षी दहावीची परीक्षा देण्याचा संकल्प केला आणि ता प्रत्यक्षात उतरवला. आपल्या दुकानाची जबाबदारी सांभाळत त्यांनी अभ्यास करून परीक्षेत 50 टक्के गुण मिळवले आहेत. शिवणकाम करणार्‍या कविता वतनदार यांनी 38 व्या वर्षी दहावी उत्तीर्ण होऊन नवा आत्मविश्वास मिळवला.

या यशस्वी महिलांना साथ मिळाली ती ‘मासूम’ या सामाजिक संस्थेची. येरवडा, लक्ष्मीनगर येथे मासूम संस्थेच्या अंतर्गत रात्रशाळा सुरू करून या संस्थेमार्फत ज्यांना दहावीचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करायचे होते अशा महिला, पुरुष, वयस्कर यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून रोज सायंकाळी लक्ष्मीनगर येथील बुद्धविहारामध्ये शिक्षणाचे धडे देण्यात आले.

संपूर्ण वर्षभर या विद्यार्थ्यांवर केंद्रप्रमुख शिक्षक मनीष भोसले व इतर शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन दहावी उत्तीर्ण होण्यास मोलाची मदत केली. जसा दहावीचा निकाल हाती आला तसे या घरकाम, धुणीभांडी करणार्‍या महिला आपण जीवनात काहीतरी नवीन यश मिळवले, या आनंदात होत्या. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण येरवडा व परिसरामधून त्यांचे कौतुक होत आहे.

हेही वाचा

Nashik : बिल्डर्सवर भरवसा नाय काय? दस्त नोंदणीला अल्प प्रतिसाद

कोरेगाव पार्क : स्थानिक नागरिकांकडून नोटिशीनुसार कारवाई थांबविण्याचे प्रयत्न

Kolhapur : शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे, लाऊडस्पीकरही बंद

Back to top button