चित्रबलाक पक्ष्यामुळे इंदापूर शहराच्या वैभवात भर | पुढारी

चित्रबलाक पक्ष्यामुळे इंदापूर शहराच्या वैभवात भर

जावेद मुलाणी

इंदापूर (पुणे) : कच्छच्या रणातून दरवर्षीप्रमाणे आलेल्या चित्रबलाक या सैबेरियन पक्ष्यांचे गोकूळ यंदाही इंदापूर येथे फुलले आहे. त्यांना पाहण्यासाठी राज्यभरातून पक्षी अभ्यासक इंदापूरला येत आहेत. परिणामी, इंदापूरची नवीन ओळख निर्माण झाली आहे. सुरुवातीस 40 ते 50 च्या संख्येने आलेले चित्रबलाक आता 400 ते 500 झाले आहेत. त्यांच्या नयनमनोहर कवायती पक्षिप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहेत. सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे, तसेच मुंबई परिसरातील अनेक पक्षी अभ्यासकांनी इंदापूर शहरात हजेरी लावली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची शहर कसब्यात ऐतिहासिक गढी असून, तिच्यात सुफी संत चाँदशाहवली बाबा दर्गा व तुरुंग आहे. येथील तहसील कार्यालय व न्यायालय हे नूतन इमारतीत स्थलांतरित झाले आहेत. हे प्रांगण तसेच पाठीमागील चिंचेच्या प्रत्येकी दोन झाडांवर गत 5 दशकांपासून चित्रबलाक पक्षी आपले सारंगगार फुलविण्यासाठी येतात.

शहराशेजारी उजनी धरणाचे विस्तीर्ण पाणलोट क्षेत्र असल्यामुळे त्यांना आवश्यक खाद्य म्हणजे, मासे व शेवाळ सहज उपलब्ध होतात, त्यामुळे ते डिसेंबरअखेरीस इंदापूरला येतात. नागरी वस्तीपासून बाजूस असलेल्या येथील झाडांवर उंचावर घरटी बांधतात.
जानेवारी, फेब—ुवारी महिन्यात ते सारंगगार फुलवितात.

मार्च, एप्रिल, मे व जुन महिन्यात चित्रबलाक आपल्या बाळांना उडणे तसेच खाद्य आणायचे प्रशिक्षण देतात. लाल चोच, पांढरे शरीर असलेला हा पक्षी अत्यंत आकर्षक असून, त्याचा कसलाही त्रास मनुष्यास होत नाही. त्यांचे निवासस्थान असलेली गढी ही उंचावर असल्याने त्यांच्या सारंगगारास नैसर्गिक सुरक्षितता मिळते. त्यामुळे त्यांचा इंदापूर येथील अधिवास सुखदायी असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीस जून महिन्यात पुन्हा आपल्या नवीन पिढीसह कच्छच्या रणातून सैबैरिया देशात ते परत जातात.

येथील नैसर्गिक हवामानामुळे गत सात वर्षांपासून काही चित्रबलाक पक्षी येथेच कायमस्वरूपी राहू लागले आहेत. चुकून एखादे पक्ष्याचे पिलू अथवा पक्षी खाली पडल्यास स्थानिक नागरिक तत्काळ इंदापूर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभाग अथवा निमगाव केतकी गावातील फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबच्या सदस्यांना बोलावून त्याच्यावर उपचार करतात.

दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात थंडी वाढली की, चित्रबलाक पक्ष्यांचे आगमन उजनी जलाशयाच्या पाणवठ्यानजीक होते. तेथेच विणीचा हंगाम पार पडतो. मग सहा महिने या पक्ष्यांच्या गजबजाटाने उजनी परिसर खुलून जातो. विणीच्या हंगामासाठी वसवलेल्या वसाहतीला ‘सारंगगार’ म्हणतात. सलग सहा महिने या सारंगगाराला अनेक पक्षिमित्र, निसर्गमित्र भेट देतात. सध्या या पक्ष्यांची वीण झाली असून, त्यांची पिले उड्डाणक्षम होण्यासाठी आकाशात विहार करत आहेत. या आकाशविहाराच्या सुंदर कवायती पाहणे हा इंदापूरवासीयांचा नित्यक्रम झाला आहे.

सुंदर गिधाडाच्या आकाराचा पक्षी

चित्रबलाकला इंग्रजीत ‘पेंटेड स्टॉर्क’ असे म्हणतात. तसेच त्यास ‘चाम ढोक’ किंवा ‘रंगीत करकोचा’ असेही म्हणतात. हा पक्षी साधारणपणे गिधाडाच्या आकाराचा असून, पाणथळ जागेत आढळतो. सुमारे तीन किलो वजनाचा चित्रबलाक उभा असता, त्याची उंची 95-100 सें. मी. भरते. उडताना पंखांच्या बाजूने लांबी 150-160 सें. मी. भरते. चोच पिवळ्या रंगाची, टोकाकडे किंचित बाकदार, मोठी आणि लांब असून, चेहरा मेणासारखा पिवळा, त्यावर पिसांचा अभाव, उर्वरित सर्वांगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट-काळ्या खुणा, पंख गुलाबी, छातीवर आडवा काळा पट्टा असतो. चित्रबलाक नर-मादी दिसायला सारखेच असतात.

हेही वाचा

Odisha | ओडिशात आणखी रेल्वे अपघात, बारगढमध्ये मालगाडी रुळावरून घसरली

महाळुंगे इंगळे : औद्योगिकीकरणाच्या नावाखाली टेकड्यांची लचकेतोड

‘भामा आसखेड’ प्रकल्पास गती मिळाल्याचा आयुक्तांचा दावा

Back to top button