महाळुंगे इंगळे : औद्योगिकीकरणाच्या नावाखाली टेकड्यांची लचकेतोड | पुढारी

महाळुंगे इंगळे : औद्योगिकीकरणाच्या नावाखाली टेकड्यांची लचकेतोड

हनुमंत देवकर

महाळुंगे इंगळे(पुणे) : औद्योगिकीकरणाच्या नावाखाली विकास करताना डोंगर-टेकड्यांचे संरक्षण करण्याऐवजी लचके तोडण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. चाकण औद्योगिक परिसरात हे चित्र पाहावयास मिळत आहे. डोंगर-टेकड्या फोडून निसर्गाची हानी करणार्‍यांवर कारवाईची मागणी होत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एकीकडे वृक्षारोपण करणार्‍या संस्था, तर दुसरीकडे टेकड्या जमीनदोस्त करून उभे राहणारे उद्योग, कारखाने हा विरोधाभास पाहायला मिळत आहे. चाकण परिसरातील औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणावर जल व वायू प्रदूषण करीत आहेत.

कुरुळी येथे डोंगर पोखरून अनेकांनी हॉटेल, पेट्रोल पंप, शोरूम, वेअरहाऊस आदी उद्योग सुरू केले आहेत. महाळुंगेतदेखील डोंगर-टेकड्या फोडून उद्योजकांनी डोंगरकपारीमध्ये कारखाने उभे केले आहेत. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच वाघजाईनगर येथे उद्योजकांनी टेकडी फोडून त्यातील गौण खनिज काढून कपारीमध्ये कारखाने बांधले आहेत.

खराबवाडीतील गायरान असलेला डोंगर फोडून डबराची अवैध विक्री सुरू आहे. त्यात चाकण नगरपरिषदेने कचरा टाकून मोठा कचरा डेपो बनविला आहे, त्यामुळे दगड खाणीतील पाणी दूषित झाले आहे. हेच पाणी लगतच्या विहिरींना व बोअरवेलला झिरपून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर येथील कचरा जाळून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण केले जात आहे.

अशाच प्रकारे पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव रस्ता, सारा सिटी ते अराई चौकादरम्यान मोठ्या प्रमाणावर कचर्‍याचे ढीग लागले आहेत, त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी डोंगर शिल्लक आहेत त्या ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण करण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे.

Back to top button