‘भामा आसखेड’ प्रकल्पास गती मिळाल्याचा आयुक्तांचा दावा | पुढारी

‘भामा आसखेड’ प्रकल्पास गती मिळाल्याचा आयुक्तांचा दावा

पिंपरी (पुणे) : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहराला भामा आसखेड धरणातून तातडीने पाणी मिळावे म्हणून शासनाच्या विविध विभागांकडील जागा भूमिगत मुख्य जलवाहिनीसाठी ताब्यात घेण्याच्या कार्यवाहीस गती देण्यात आली आहे. त्या संदर्भात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्यांसमवेत 3 बैठका घेण्यात आल्या आहेत. जलवाहिनीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

वाढत्या शहरासाठी पाण्याची गरज असल्याने भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी आणि आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी शहराला लवकरात लवकर मिळावे म्हणून पालिका प्रशासन राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. राज्य शासनाचे वन, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, पाटबंधारे विभाग तसेच, राज्य महामार्ग प्राधिकरण अशा वेगवेगळ्या विभागांकडून तसेच, शेतकरी व जागामालकांकडून जलवाहिनीसाठी जागा ताब्यात येण्यास विविध कारणांमुळे विलंब होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. त्याबाबत विचारले असता ते बोलत होते.

आयुक्त सिंह म्हणाले की, भामा आसखेड प्रकल्पासाठी विविध विभागांकडून जागा ताब्यात घेण्यासाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्यांसमवेत आतापर्यंत विविध 3 बैठका झाल्या आहेत. संबंधित विभागांकडून जागा ताब्यात देण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर पालिकेच्या ताब्यात त्या जागा येतील.

तसेच, जलवाहिनीसाठी जागा ताब्यात घेण्याचा नियम वेगळा आहे. त्यानुसार शेतकरी व जागामालकांशी चर्चा करून भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्या कामासाठी पोलिस बंदोबस्त घेण्यात येत आहे. भामा आसखेड धरणाजवळ जॅकवेलचे काम सुरू झाले आहे. ते आणि भूमिगत जलवाहिनी काम एकाच वेळी समांतर पद्धतीने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

गरज भासल्यास 100 एमएलडी पाणी उचलू

चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून 100 ऐवजी 50 एमएलडी पाणी उचलले जात आहे. ते चिखली परिसरातील भागांना पुरविले जात आहे. मागणी वाढल्यास त्या प्रमाणात पाणी अधिक उचलण्यास सुरूवात केली जाईल. सध्या 50 एमएलडी पाणी पुरेसे असल्याने तितके पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधारा येथून उचलण्यात येत आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

Back to top button