पुणे शहराला पावसाने धो धो धुतले | पुढारी

पुणे शहराला पावसाने धो धो धुतले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील बहुतांश भागात रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावत रस्ते जलमय केले. दुपारी तीनपर्यंत कमालीचा उकाडा होता. त्यानंतर मात्र पावसाने अल्हाददायक वातावरण तयार झाले. शहरात 13 ते 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.रविवारी शहरात प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र, दुपारी 4 वाजता आकाशात अचानक काळ्याभोर ढगांनी गर्दी केली.

गारा वारा सुटला. त्यामुळे उष्मा कमी झाला. थोड्यात वेळात शहरातील बहुतांश भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. वार्‍याचा वेग कमी होता. त्यामुळे झाडपडीच्या घटना घडल्या नाहीत. सुमारे अर्धा तास शहरातील बहुतांश भागांत पावसाने रस्ते जलमय केले.
शिवाजीनगर, हडपसर, लवासा, पाषाण, कोरेगाव पार्क, मगरपट्टा, वडगावशेरी भागात मोठा पाऊस झाला.

कुठे-किती पाऊस?

शिवाजीनगर 13.3, हडपसर 20, लवासा 15, पाषाण 8.5, बालेवाडी 1.5, कोरेगाव पार्क 3, चिंचवड 7.5, मगरपट्टा 8.5, वडगावशेरी 16 मिलिमीटर.

हडपसर परिसरात जोरदार बरसला

परिसरात रविवारी दुपारी अडीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. तसेच काही सोसायट्याच्या पार्किंगमध्येही पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. या पावसामुळे हवेत गारावा निर्माण झाल्याने उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. नोबल हॉस्पिटलसमोरील परिसर पाणी साचल्याने परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला. उड्डाणपुलावरून येणारी वाहने संथगतीने मुंढव्याच्या दिशेने जात होती. ससाणेनगर, रामटेकडी, मगरपट्टा, माळवाडी व अमर कॉटेज परिसरात अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ जोरदार पाऊस पडला.

सात ठिकाणी झाडपडीच्या घटना

शहरात हडपसर, माळेवाडी भागात सर्वाधिक 20 मिलिमीटर पाऊस झाला. या भागात सात ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. जवानांनी तत्काळ झाडे हटवली.

हेही वाचा 

राज्यातील कारागृहे ’ओव्हर फ्लो’! या कारागृहांत क्षमतेपेक्षा 300 टक्क्यांहून अधिक कैदी

पुणे-मुंबई मार्गावर सर्वांत लांब जुळे बोगदे

व्हिडीओ पाहून कुकिंग करत असाल तर हे नक्की वाचा!

Back to top button