राज्यातील कारागृहे ’ओव्हर फ्लो’! या कारागृहांत क्षमतेपेक्षा 300 टक्क्यांहून अधिक कैदी | पुढारी

राज्यातील कारागृहे ’ओव्हर फ्लो’! या कारागृहांत क्षमतेपेक्षा 300 टक्क्यांहून अधिक कैदी

महेंद्र कांबळे

पुणे : कोरोना साथीत कारागृहांतील कमी केलेली कैद्यांची संख्या पुन्हा वाढली असून, राज्यातील 15 कारागृहांत क्षमतेपेक्षा 300 टक्क्यांहून अधिक कैदी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कारागृहे ‘ओव्हर फ्लो’ झाली आहेत. राज्यातील कारागृहातील कच्च्या कैद्यांपेक्षा पक्क्या कैद्यांची संख्या कमी आहे. 30 एप्रिलअखेर राज्यातील विविध कारागृहांत शिक्षा झालेले पुरुष कैदी 7 हजार 850, तर स्त्री कैदी 252 इतके आहेत.

तर न्यायालयीन पुरुष कैद्यांची संख्या 30 हजार 853 इतकी आहे. स्त्री न्यायालयीन कैद्यांची सख्या 1 हजार 326 इतकी आहे. तर स्थानबद्ध पुरुष कैदी 215 इतके आहेत. शिक्षा झालेल्या न्यायालयीन कैद्यांची एकूण संख्या 79 टक्के, शिक्षा लागलेल्या कैद्यांची संख्या 20 टक्के, तर स्थानबध्द करण्यात आलेल्या गुन्हेगारांची संख्या 1 टक्के इतकी आहे.

कारागृहातील बंदिवान, कैद्यांची संख्या पाहता पालघर तसेच नगर येथील नारायण डोह येथे कारागृहासाठी जागा मंजूर करण्यात आली आहे. तर गोंदिया, हिंगोली, ठाणे, भुसावळ या ठिकाणी कारागृहांसाठीचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. नुकतीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील तुर्भे, तसेच येरवडा कारागृहाजवळ उपलब्ध जागेच्या ठिकाणी कारागृह बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली. वरील सर्व कामे झाल्यास आणि प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास सुमारे दहा हजार अधिक बंदिवान क्षमता वाढून इतर कारागृहावरील ताण कमी होईल.

– अमिताभ गुप्ता, अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा

Back to top button