व्हिडीओ पाहून कुकिंग करत असाल तर हे नक्की वाचा! | पुढारी

व्हिडीओ पाहून कुकिंग करत असाल तर हे नक्की वाचा!

न्यूयॉर्क : आताच्या युगात जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल असतो. या मोबाईलच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकता येतात. भारतात तरी जवळपास बर्‍याच गृहिणी मोबाईलवरील व्हिडीओ पाहून स्वयंपाकात वेगवेगळे प्रयोग राबवते. काही वेळा तर यातील काही प्रयोग असे भन्नाट जमतात की, कौतुकाचा अक्षरश: वर्षाव होत राहतो. मात्र, काही वेळा असे प्रयोग अगदी जीवावर बेतू शकतात आणि असाच एक किस्सा शाफिआ बशीर या महिलेबाबत घडला आहे.

अमेरिकेत राहणारी शाफिआ बशीरने सोशल मीडियावर नवी एग रेसिपी पाहिली होती. ती तिने घरी करून पाहण्याचे ठरवले. ही रेसिपी मायक्रोवेवर करायची होती. तिने दाखवलेल्या प्रोसेसप्रमाणे मायक्रोवेव सुरू केला. पण, याचवेळी अचानक मायक्रोवेवचा स्फोट झाला आणि शाफिआचा चेहरा बराच भाजून निघाला. मायक्रोवेवमधील गरम अंडी थेट तिच्या चेहर्‍यावर आपटली आणि ते इतके उष्ण होते की, तिच्या त्वचेचा वरचा स्तर भाजून निघाला. वेदनेने कळवळलेल्या शाफिआला त्यानंतर लगेच इस्पितळात नेण्यात आले.

आता तिची तब्येत व्यवस्थित आहे. त्वचेवर क्रीम लावल्याने याचा तिला बराच लाभ झाला. पण, आता ती किचनमध्ये नवे प्रयोग करताना हजार वेळा विचार करेल, हे निश्चित!

Back to top button