पुणे: ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे वाचले तिघांचे प्राण | पुढारी

पुणे: ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे वाचले तिघांचे प्राण

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या 40 वर्षीय व्यक्तीला 29 मे रोजी ब्रेन डेड घोषित केल्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात (डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) त्यांचे अवयव दान करण्यात आले. कुटुंबीयांच्या संमतीनंतर त्या व्यक्तीचे हृदय, 2 मूत्रपिंडे, यकृत, स्वादुपिंड आणि 2 कॉर्निया दान केल्याने तीन लोकांचे प्राण वाचले आहेत.

एका 40 वर्षीय व्यक्तीचा 24 मे रोजी अपघात झाला होता. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना 29 मे रोजी ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांचे अवयव दान करण्यात आले.

गुंतागुंतीच्या अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेने अहमदनगर येथील रहिवासी असलेल्या 30 वर्षांच्या तरुणाचे प्राण वाचवण्यात आले. जो टाईप 1 मधुमेहाने सीकेडीने (क्रॉनिक किडनी डिसीज) ग्रस्त होता. त्यांच्यावर किडनी आणि स्वादुपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. ते 7 वर्षांपासून प्रतीक्षा यादीत होते. दुसरा 50 वर्षांचा पुरुष रुग्ण शेवटच्या टप्प्यात यकृत आणि किडनीच्या जुनाट आजाराने ग्रस्त होता. त्यांच्यावर मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रिया एकाच छताखाली आणि त्याच दिवशी यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. ज्यामुळे संस्थेसाठी आणखी एक महत्त्वाची कामगिरी नोंदविली गेली. पुणे झेडटीटीसीसी निकषानुसार डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दोन रुग्णांना किडनी आणि स्वादुपिंड व मूत्रपिंड आणि यकृत देण्यात आले. तर, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात एका रुग्णाला हृदय दान करण्यात आले.

40 वर्षांच्या दात्याचा ऑफिसला जात असताना अपघात झाला होता. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो ब्रेनडेड झाल्याने ही घटना कुटुंबासाठी अनपेक्षित आघात ठरली. मात्र, त्याच्या कुटुंबाने अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला, अशी माहिती डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. वृषाली पाटील यांनी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनीषा करमरकर यांनी आव्हानात्मक प्रकरणे हाती घेतल्याबद्दल आणि क्लिनिकल उत्कृष्टता प्राप्त केल्याबद्दल संपूर्ण टीमचे कौतुक केले. एकाच छताखाली एकाच वेळी दुहेरी प्रत्यारोपण करण्याची गेल्या 6 महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे. त्यांनी नमूद केले की, डीपीयूमध्ये अवयवदानाबद्दल जनजागृती आणि शिक्षित करण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो.

जशी जागरुकता वाढत आहे तसतशी अनेक कुटुंबे आपल्या प्रिय व्यक्तींचे अवयव दान करण्यासाठी पुढे येत आहेत. डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे पुण्यातील एकमेव खासगी रुग्णालय आहे, ज्याला विविध बहु-अवयव प्रत्यारोपणाचे श्रेय दिले जाते. आम्ही अवयवदान आणि प्रत्यारोपण सुलभ करण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करणे सुरू ठेवले आहे.

– डॉ. यशराज पाटील, विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी.

 

हेही वाचा:

आषाढी वारीसाठी चोख नियोजन करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे: एड्स नियंत्रण सोसायटीला मिळणारी देणगी होणार करमुक्त

 

Back to top button