तळेगाव ढमढेरेत 2 बिबट्यांच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार | पुढारी

तळेगाव ढमढेरेत 2 बिबट्यांच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

तळेगाव ढमढेरे(ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : तळेगाव ढमढेरे येथील कवठीचा मळा येथे सुरेश ढमढेरे यांच्या शेतजमिनीत वास्तव्यास असणार्‍या मेंढपाळ नवनाथ गजानन उकले यांच्या बकर्‍यांच्या वाड्यावर दोन बिबट्यांनी हल्ला केला. त्यात तीन शेळ्या ठार झाल्या. ही घटना बुधवारी (दि. 24) रात्री आठच्या सुमारास घडली. उकले कुटुंब बुधवारी रात्री आठच्या सुमारास जेवण करीत असताना वाघरीवरून उडी मारून दोन बिबटे बकर्‍यांच्या कळपात घुसले. त्यांनी तीन शेळ्यांवर हल्ला केल्याचे उगले कुटुंबीयांनी पाहिले.

त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबटे पळून गेले. मात्र, या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या. या प्रसंगामुळे मेंढपाळ कुटुंबीय धास्तावले. बिबट्याच्या हल्ल्यात संदीप बाळासाहेब ढमढेरे यांच्या मालकीच्या दोन, तर जालिंदर भाऊसाहेब ढमढेरे यांची एक शेळी ठार झाली. या घटनेचा पंचनामा शिरूर वन विभागाचे वनरक्षक बबन दहातोंडे, वन कर्मचारी आनंदा हरगुडे, रेस्क्यू टीमचे सदस्य शेरखान शेख, गणेश टिळेकर यांनी केला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य गोविंद ढमढेरे, संतोष ढमढेरे, संजय जेधे, नवनाथ उकले, संदीप ढमढेरे, सुरेश ढमढेरे आदी उपस्थित होते.

दरम्यान, रविवारी (दि. 21) पहाटे तळेगाव ढमढेरे परिसरातील ढमढेरेवस्ती येथे वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाला होता. परंतु, तीनच दिवसांनी दोन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे या परिसरात आणखी बिबटे असल्याचे सिध्द झाले आहे. पाळीव प्राण्यांची शिकार करण्यासाठी बिबटे वारंवार मनुष्यवस्तीत येत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. या परिसरात बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा बसविण्याची मागणी या भागातील शेतकरी व मेंढपाळ यांनी केली आहे.

Back to top button