सिंहगड किल्ल्यावरील ’रोजगार कुटी’ प्रकल्प कागदावरच! | पुढारी

सिंहगड किल्ल्यावरील ’रोजगार कुटी’ प्रकल्प कागदावरच!

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सिंहगड किल्ल्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना वनखात्याने अद्यापही रोजगार कुट्या (स्टॉल) दिले नाहीत. यामुळे विक्रेत्यांना रणरणत्या उन्हात हलाखीला तोंड द्यावे लागत आहे. या प्रकल्पासाठी निधी मिळत नसल्याने वनविभाग
हतबल झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी वनविभागाने सिंहगडावर अतिक्रमण कारवाई करून दीडशेहून आधिक खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल, हॉटेल जमीनदोस्त केली. त्या वेळी नोंदणीकृत विक्रेत्यांना रोजगार कुटी स्टॉल देण्याचे आश्वासन वन विभागाने दिले होते. खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी सिंहगडावर अद्ययावत पर्यावरणपूरक रोजगार कुट्या उभारल्या जाणार होत्या.

वन विभागाने नोंदणीकृत 73 विक्रेत्यांची यादीही तयार केली आहे. या उपक्रमासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी वन विभागाने स्थानिक खासदार, आमदार, तसेच जिल्हा नियोजन समितीकडे केली होती. मात्र, गेल्या सहा महिन्यांत निधी मंजूर झाला नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेते वार्‍यावर आहेत. वन व्यवस्थापन समितीच्या वतीने विक्रेत्यांना रोजगार कुट्या देण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विकास समितीकडे प्रस्ताव दिला आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर दोन महिन्यांत विक्रेत्यांना स्टॉल देण्याचे आश्वासन सहा महिन्यांपूर्वी वनविभागाने दिले होते.

दोन कोटींच्या निधीची गरज

सिंहगड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ म्हणाले की, गडावर खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍या नोंदणीकृत 73 विक्रेत्यांना रोजगार कुट्या देण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. मात्र, अद्यापही निधी उपलब्ध न झाल्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्टॉल देता आले नाहीत.

स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून सिंहगडावर झुणका-भाकर, दही-ताक आदी खाद्यपदार्थांची विक्री करत आहेत. वन खात्याने या विक्रेत्यांना रोजगार कुट्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही त्याची पूर्तता करण्यात आली नाही. पावसाळ्यापूर्वी या विक्रेत्यांना स्टॉल न दिल्यास आंदोलन केले जाईल.

                          – नवनाथ पारगे, माजी सदस्य, जिल्हा परिषद

गडाच्या पावित्र्यासाठी विक्रेत्यांनी सहकार्य केले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दहा फुटांच्या स्टॉलमध्ये खाद्य पदार्थांची विक्री करावी लागत आहे. आर्थिक हलाखीमुळे चांगले स्टॉल उभारता येत नसल्याने गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे.

                                               – अमोल पढेर, खाद्यपदार्थ विक्रेते

Back to top button