पुणे : शिक्षण संचालनालयाकडून योजनांचा ‘जागर’! | पुढारी

पुणे : शिक्षण संचालनालयाकडून योजनांचा ‘जागर’!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : समाजातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी योजना शिक्षण संचालनालयाने कालबद्ध कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. आधीपासूनच अस्तित्वात व कार्यान्वित असलेल्या काही योजना प्रभावीपणे तळापर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. त्यासाठी राज्यस्तरावर एप्रिल 2023 पासून सुरू केलेला हा ‘जागर’ जुलै 2023 मध्ये शाळा स्तरापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आहे. राज्य आणि जिल्हास्तरावर उपलब्ध असलेल्या अत्यल्प अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पार्श्वभूमीवर या योजना तडीस नेण्याचे आव्हान या संचालनालयासमोर आहे.

अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाची पुनर्रचना करून राज्यासाठी शिक्षण संचालनालय योजना आणि जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी योजना कार्यालयाची निर्मिती राज्य शासनाने केली. प्राथमिककडील नऊ, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या चोवीस आणि अल्पसंख्यांक प्रौढ शिक्षण संचालनालयाकडील सात अशा एकूण 40 योजनांचे एकत्रीकरण करून शिक्षण संचालनालया (योजना) ची पुनर्रचना करण्यात आली आहे.

योजना संचालनालय व परीक्षा परिषदेने राज्यात 12 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या कार्यशाळा घेतल्या. योजना संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांच्यासह सहसंचालक अनिता कडू, उपसंचालक राजेश क्षीरसागर, परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांचा समावेश असलेल्या चमूने विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी प्राथमिक, माध्यमिक, योजना, प्रशासन अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक यांना प्रशिक्षण दिले आहे.

आता 19 मे रोजी संचालक डॉ. पालकर यांनी जिल्हा, तालुका व शाळास्तरावर योजनांबाबत राबवायचा कालबद्ध कार्यक्रम क्षेत्रीय अधिकार्‍यांना परिपत्रकाद्वारे कळविला आहे. त्यात गटशिक्षणाधिकारी, यांच्यासह विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख हे मार्गदर्शन करणार आहेत. योजना संचालनालयाने, योजना माहितीपुस्तिका, घडीपत्रिका, तपासणीसूची, पीपीटी विकसित केली आहे.

मुद्रित माध्यमे, समाजमाध्यमे, आकाशवाणी यांचा उपयोग करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, योजनांबाबतचे फ्लेक्स स्वनिधीतून लावण्याबाबत शाळांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. क्षेत्रीय अधिकारी आणि शाळांनी योजनांची माहिती दर्शनी भागात, काचफलकात लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, योजनांचे व्हिडिओ /रिल्स बनवण्यासही उत्तेजन देण्यात आले आहे. प्रत्येक टप्प्यावर घेण्यात आलेल्या कार्यशाळा व सभांचे इतिवृत्त आठ दिवसांत वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याचेही निर्देश संचालनालयाने दिले आहेत.

संचालनालयाकडील प्रत्येक योजनेची माहिती विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून, शिक्षण विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांमार्फत शाळांना आवश्यक माहिती व सूचना देण्यात येत आहेत.

                                      – डॉ. महेश पालकर, संचालक, योजना संचालनालय

Back to top button