जेजुरीच्या मुख्य चौकात वाहतूक कोंडी | पुढारी

जेजुरीच्या मुख्य चौकात वाहतूक कोंडी

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : जेजुरीच्या मुख्य चौकातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे वाहनचालक, भाविक, स्थानिक दुकानदार त्रस्त झाले आहेत. जेजुरी शहरातून पालखी महामार्ग नकोच, अशी मागणी नागरिकांनी शासनाकडे केली आहे. मात्र, त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणार्‍या पुणे – पंढरपूर महामार्गावर कडेपठार कमान (राजर्षी शाहू चौक) ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आदी ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यामुळे फलटण, मोरगाव आणि पुण्याकडे जाणार्‍या वाहनांची मोठी रांग लागते. अनेकदा रुग्णवाहिका, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वाहने या कोंडीत अडकली आहेत.

रविवार हा खंडेरायाचा दर्शनाचा वार असल्याने शहरात येणार्‍या वाहनांची संख्या लक्षणीय असते. त्यांना शहरात जायचे झाल्यास, कडेपठार कमान, छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याशिवाय पर्याय नाही. तिन्ही ठिकाणी प्रवेशद्वारावर वाहन प्रवेश कर वसुलीचे ठाणे असल्याने तेथेही हीच समस्या आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासनाची चांगलीच दमछाक होते.

वाहतूक कोंडीचा परिणाम व्यापारावरदेखील झाला आहे. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून बाह्यवळण मार्ग अथवा अस्तित्वात असणार्‍या रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान रस्ता केल्यास कायमचा तोडगा निघू शकतो. पालखी मार्ग विकसित होत असताना पुरंदर तालुक्यातील सासवड व निरा येथे बाह्यवळण मार्ग काढण्यात आला आहे.

मात्र, जेजुरी शहरातून पालखी महामार्ग करण्याचा अट्टाहास केला जात आहे. विशेष म्हणजे 2015 मध्ये या रस्त्याच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणे काढण्यासाठी खुणा करून केवळ रस्त्याच्या उत्तरेकडील घरे आणि दुकाने जबरदस्तीने पाडण्यात आली. ज्यांची घरे व दुकाने पाडण्यात आली त्यांना अद्याप नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. आता पुन्हा पालखी महामार्गसाठी केवळ रस्त्याच्या उत्तरेकडील घरे व दुकाने पडण्याचा घाट घातला आहे.

पालखी महामार्गाला विरोध नाही

या पालखी महामार्गाला नागरिकांचा विरोध नाही, मात्र अस्तित्वात असणार्‍या रस्त्याच्या मध्यातून दोन्ही बाजूला समसमान रुंदीकरण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. याबाबत सर्व स्तरावर निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

Back to top button